जहांगिर आर्ट गॅलरीत चित्रकर्ती बुलबुल राय हिचे ‘श्रीकंठाय’ हे चित्र प्रदर्शन

News Service

चित्रकर्ती: बुलबुल राय
स्थळ: जहांगिर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई
कालावधी: २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२४
सकाळी ११ ते संध्याकाळी ७ या वेळेत

“श्रीकंठाय”

            अहमदाबाद येथील प्रसिद्ध चित्रकर्ती बुलबुल राय हिच्या तैलरंग व ऍक्रिलिक रंग वापरून कॅनव्हासवर काढलेल्या चित्रांचे एकल प्रदर्शन जहांगिर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई ४००००१ येथे २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२४ ह्या दरम्यान भरणार आहे. ते तेथे सर्वांना रोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत विनामूल्य बघता येईल. ह्या प्रदर्शनात तिने भगवान श्री नीलकंठ अर्थात भगवान शंकर ह्यांच्या जीवनातील विविध पैलू चित्रमाध्यमातून आपल्या कलात्मक व वैशिट्यपूर्ण शैलीत सर्वांपुढे ठेवले असून त्यातील धार्मिक संकल्पना, वैचारिक आणि वैषयिक स्पष्टता व बोलकेपणा सर्वांना भावणारा आहे.              

    प्रस्तुत  प्रदर्शन श्रीकंठाय ह्यामध्ये बुलबुल राय हिने तैलरंग व ऍक्रिलिक रंग वापरून कॅनव्हासवर काढलेल्या चित्रांचे सादरीकरण केले आहे. त्यातील मुख्य संकल्पना भगवान नीलकंठ अर्थात शिवशंकर व त्याच्या जीवनातील विविध पैलू ह्यावर आधारित आहे. तशी संकल्पना करून श्रीकंठाय श्रीकंठाय ह्या पवित्र मंत्राचा १०८ वेळा जप करून त्याद्वारे दुःख, औदासिन्य, नाराजी व मानवी जीवनातील प्रतिकूल लहरींना दूर  सारून त्याऐवजी सकारात्मक ऊर्जा व शक्ती तसेच चैतन्य ह्यांचे वरदान लाभो ही मनोकामना तिने चित्रमाध्यमातून व्यक्त केली आहे. तिने ह्याद्वारे भगवान नीलकंठ  अर्थात शिवशंकर ह्यांना आपली कलात्मक आदरांजली वाहिली आहे. त्यासाठी तिने शंकराचे वाहन नंदीबैल, गण वगैरे दर्शविताना गळ्यातील सर्पमाला, नंदी, बिल्वदल पत्र, डमरू, त्रिशूल इत्यादी प्रतीकांचा कलात्मक वापर केला आहे. १२ पैकी ६ ज्योतिर्लिंगावरील धार्मिक वातावरण व संकल्पना दर्शविताना तिने सोमनाथ, केदारनाथ, भीमाशंकर, महाकालेश्वर, रामेश्वरम  व विश्वनाथ मंदिर वाराणसी ह्यांचा प्रभावीपणे वापर केला आहे.

              आपल्या चित्रातून तिने प्रभावीपणे व परिणामकारक रीतीने तिने शिवाचे अस्तित्व व ती चिरंतन टिकणारी नादमय धार्मिक संकल्पना व अनुभूती ह्यांचा कलात्मक आणि सौंदर्यपूर्ण वापर केला आहे. तिच्या मनातील दृढ व कायमस्वरूपी भक्तिभाव आणि ती सकारात्मक ऊर्जा व शक्ती सर्वांपर्यंत पोचविण्याचा तिने ध्यास घेतला आणि त्या अर्थपूर्ण चित्रसंपदेतून  तिने भगवान शंकर व त्यांच्या जीवनातील विविध पैलू आपल्या अनोख्या शैलीत अधोरेखित करून प्रस्तुत चित्रसंपदा ह्या प्रदर्शनात सर्वांपुढे सादर केली आहे. त्यात तिचा उद्देश सर्व मानवजातीस निरामय सुखशांती लाभून तिचे मंगल व कल्याण होवो आणि सर्व चराचरात आनंद व चैतन्यलहरींचा दरवळ जनमानसात पसरो ही शुभेच्छा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button