चित्रकार: राजेंद्र चौहान
स्थळ: जहांगिर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई
कालावधी: २१ ते २७ ऑक्टोबर २०२४
वेळ: सकाळी ११ ते संध्याकाळी ७
निसर्गरम्य कलाविष्कार
सुप्रसिद्ध चित्रकार राजेंद्र चौहान ह्यांचे एकल कला प्रदर्शन जहांगीर कलादालन नं.४, महात्मा गांधी मार्ग, काळा घोडा, मुंबई ४०० ००१ येथे २१ ते २७ ऑक्टोबर २०२४ ह्या कालावधीत भरणार आहे. ते तेथे सर्वांना सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत विनामूल्य बघता येईल. ह्या प्रदर्शनात त्यांनी निसर्गातील विविध सुखद शांततामय अनुभूतीचा आपल्या चित्रमाध्यमातून सर्वांना एक कल्पातीत व सुरम्य असा अनुभव दिला आहे. ह्या प्रदर्शनाचे उद्घाटन २१ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ४ वाजता जहांगीर कलादालन, मुंबई येथे होईल त्यावेळी मुख्य पाहुणे म्हणून डॉ. सुधांशू मणी – निवृत्त सरव्यवस्थापक – भारतीय रेल्वे व वंदे भारत एक्सप्रेसचे पुरस्कर्ते, श्रीमती टीना कौर परिश्चा भारतीय चित्रपट निर्माती, पुरस्कार विजेती लेखिका व श्री मुरली रामन – दृश्य चित्रकार आणि पुरस्कारप्राप्त लेखक व चित्रपट निर्माता ह्यांची उपस्थिती राहील. तसेच तेथे अनेक कलाप्रेमी, संग्राहक व कला प्रोत्साहक आणि सामान्य कलारसिक ह्यांचीही उपस्थिती राहील. प्रस्तुत प्रदर्शनात त्यांनी जलरंगातून साकारलेली निसर्गातील शांततामय अनुभूतीचा कलात्मक आविष्कार दर्शविणारी विविध चित्रे ठेवली आहेत. सकाळच्या शांत वातावरणापासून ते सायंकाळच्या उत्तेजक पण काहीशा उदास वातावरणातील सदैव आढळणाऱ्या अनेक छटा आपल्या खास शैलीत त्यांनी आपल्या चित्रमाध्यमातून रसिकांपुढे ठेवल्या आहेत. निसर्गातील निरामय शांतता व तिची विविध ऋतूतील अनुभूती आणि सुखद अनुभव आपल्या कुंचल्यातून वैशिष्ट्यपूर्ण रीतीने व सौंदर्यपूर्ण रचनात्मक कलाकृतीतून साकारताना चित्रकाराने आपले माध्यमांवरील प्रभुत्व व स्पष्ट संकल्पना तसेच कलेच्या विविध रूपातील वैषयिक स्पष्टता आणि प्रगल्भता ह्यांचे नितान्तसुन्दर व रम्यदर्शन सर्वांना येथे घडवले आहे. प्रकाशाचा दृश्य परिणाम, भासमानता, विशेष प्रशंसनीय परिणाम व अनेक ऋतूत आढळणारी निसर्गातील वैविध्यपूर्ण रूपे आणि तेथील नादमय शांततेचा रम्य आविष्कार ह्यांची अनुभूती प्रत्येकाला त्यांची चित्रे बघताना होते. फार बोलकी व अर्थपूर्ण अशी ही चित्रे, निसर्गवैभवातील पर्वत, नद्या, सरोवर, मनोहर अशी रमणीयता फार आकर्षक तऱ्हेने व प्रकटपणे मांडतात.


