चित्रकार विरेंद्र कुमार
स्थळ: जहांगीर कलादालन, काळा घोडा मुंबई
कालावधी: ५ ते ११ नोव्हेंबर २०२४
वेळ: सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यत
सुप्रसिद्ध चित्रकार विरेंद्र कुमार हयांच्या अमूर्त शैलीतील चित्रांचे ‘इन्फिनिट स्पेस’ या शिर्षकांतर्गत एकल प्रदर्शन जहांगीर कलादालन, काळा घोडा मुंबई ४००००१ येथे ५ ते ११ नोव्हेंबर २०२४ हया कालावधीत भरणार आहे ते तेथे सर्वाना रोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यत विनामूल्य बघता येईल.
प्रस्तुत प्रदर्शनात ॲक्रिलीक रंगसंगती वापरुन कॅनव्हासवर काढलेली त्यांची चित्रे अमूर्त शैलीतील असून त्यात प्रामुख्याने निसर्ग वैभव, वातावरणातील बदल आणि विविध ऋतूत होणारे त्यातील परिवर्तन हयावर
आधारित आहेत. तसेच मानवी जीवनातील भावविश्व आणि त्यातील होणारे कालानुरुप चढउतार व भावनिक संघर्ष वगैरेंचा समावेश आहे. उस्फूर्तता व स्पष्टता तसेच त्यातील आशय प्रकट करणारी अमूर्तता हयांचा कलात्मक संगम साधून त्यांनी आपल्या खास तंत्रशुध्द शैलीत बनविलेली चित्रे मनाला भुरळ पाडतात. अल्ट्रामरीन ब्लूज, जेड ग्रीन, रुबी रेड, टोपाझ यलो, वरडिन ग्रीन वगैरे रंगछाटाच्या कलात्मक वापरातून त्यांनी साधलेला अलौकिक दृश्यपरिणाम खरोखर सर्वाना थक्क करतो. त्यात नाद माधुर्य, कलात्मकता आणि अपेक्षित दृश्यपरिणाम विविध रंगलेपनातून नेमकेपणाने दाखविण्याची त्यांची तळमळ व उत्कटता हयांचे सर्वाना हया प्रदर्शनात दर्शन होते. तसेच निसर्गचित्रांमधील वैविध्य व त्यातील मानवी मनास भुरळ घालणा-या अनेक सौंदर्यपूर्ण संकल्पना हयांचे सर्वाना येथे प्रामुख्याने दर्शन घडते. त्यांच्या पासिंग थॉटस, दि रिबर्थ, स्पेपस फॉर ब्लिस, अंननोन कनेक्शन, एक्सप्लोरेशन इन ब्लू, अपस् अॅन्ड डाऊन, दि जर्नी वगैरे चित्रातून प्रत्येक सहृदय रसिकाला हया वैशिष्टयपूर्ण कलात्मक संकल्पनांची अनुभूति होते.