मुंबई, दि. १८ ऑक्टोबर
पंतप्रधानांच्या लाडक्या उद्योगपतीला मुंबई विकण्याचे षडयंत्र असून मागील महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठका ह्या अदानीला जमीन देण्यासाठीच घेतल्या का, अशी शंका येत आहे. मुंबईतील हा मोठा जमीन घोटाळा असून एका व्यक्तीसाठी केंद्र व राज्य सरकार काम करत आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांचा धारावी प्रकल्पाचा अभ्यास नाही, त्यांनी अभ्यास करून बोलावे व धारावी प्रकल्पाबाबत त्यांच्याशी कोठेही चर्चा करण्यास तयार आहे, असे आव्हानच मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिले आहे
राजीव गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना खासदार वर्षा गायकवाड यांनी धारावी प्रकल्प, राज्य सरकार व आशिष शेलार यांच्यावर तोफ डागत शेलारांचे सर्व आरोप खोडून काढले, त्या पुढे म्हणाल्या की, धारावी संदर्भात ७ लाख लोकांचा आकडा कुठून आला, असा प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे, पण शेलारांना हे माहित नसेल की त्यांच्याच सरकारने केलेल्या टेंडर डॉक्युमेंटमध्ये या ७ लाख लोकांचा उल्लेख आहे. धारावी प्रकल्प हा ‘इन सीटू’ म्हणजे धारावीच्या लोकांना धारावीत घरे देणे अशी संकल्पना आहे, असे असताना देवनारची १२५ एकर जमीन, मदर डेअरीची जमीन, मढ-मालवणची जमीन, जकात नाके, डंपिंग ग्राऊंड आणि मीठागरांच्या जमिनी अशा जवळपास एक हजार एकर जमिनी धारावीच्या नावाखाली कशाला घेतल्या आहेत? धारावी संदर्भात विधिमंडळात अनेकवेळा प्रश्न मांडले पण मुख्यमंत्री वा उपमुख्यमंत्री यांनी त्यावर कोणतेच उत्तर दिले नाही असेही खा. गायकवाड यांनी सांगितले.
मुंबईच्या बाबतीत एक व इतर बाबतीत वेगळा टीडीआर करता येणार नाही अशी मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित असलेल्या नगरविकास विभागाची भूमिका होती आणि ही फाईल दोनदा परत केली होती. नगरविकास खात्याची अशी भूमिका असताना पंतप्रधानांशी भेट झाल्यानंतर मात्र त्या फाईलवर सह्या करण्यात आल्या, हे कोणाच्या सांगण्यावरून चालले आहे? दुसरे असे की पहिल्यांदाच एक SPO बनवला आहे, ज्यानुसार अदानीला ४० टक्के टीडीआर मिळणार आहे व त्यातून बाकीच्या विकासकांना टीडीआर घ्यावा लागणार आहे. मुंबई विकास नियमावलीत धारावीसाठी ३५०० कोटी रुपये जमा केले ते कुठे आहेत? तो योजना कोणासाठी बंद केली? अदानीसाठी ? असे प्रश्न खा. गायकवाड यांनी विचारले आहेत.
भाजपाचे आमदार आशिष शेलार ज्या सर्वे बद्दल बोलत आहेत त्या सर्वेला स्थानिकांचा विरोध आहे, कारण सर्वे सरकारी यंत्रणा करत असते पण हा सर्वे DRPPL ही खाजगी कंपनी करत आहे, या कंपनीत ८० टक्के शेअर अदानींचे तर २० टक्के शेअर राज्य सरकारचे आहेत, त्यांच्यावर कोण विश्वास ठेवणार? या सर्वेवेळी पोलीस, गुंड, एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस असतात, हे कोणाला घाबरवण्याचे काम चालले आहे? धारावीकरांच्या हक्कासाठी आम्ही अदानीच्या विरोधात लढत आहोत आणि मुंबई, धारावी व गरीब माणसांच्या हक्कासाठी लढत राहणार, असा निर्धारही वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.
पत्रकाराची दंडेलशाली अत्यंत चुकीची..
यावेळी बोलताना खासदार वर्षा गायकवाड यांनी एका पत्रकाराच्या व्यवहारबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. दुपारी दोन वाजता पत्रकार परिषद घेणार हे जाहीर केले असतानाही सकाळी एका पत्रकाराने जबरदस्तीने कारमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. माझ्याशी जो गैरव्यवहार केला तो अत्यंत अयोग्य आहे. मी एक महिला लोकप्रतिनिधी आहे, सदैव पत्रकारांना वेळ देते त्यांना प्रतिक्रिया देत असते पण ज्यापद्धतीने पत्रकाराने जबरदस्तीने गाडीत घुसण्याचा प्रकार केला हे अत्यंत गंभीर आहे. याप्रकरणी पत्रकार संघाकडेही तक्रार करणार असल्याचे खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत, मुख्य प्रवक्ते युवराज मोहिते आदी उपस्थित होते.