- किशोरी पेडणेकर यांच्या टीकेला ॲड. सुशीबेन शाह यांचे चोख प्रत्युत्तर
- वरळी मतदारसंघात रंगला आरोप – प्रत्यारोपांचा सामना
प्रतिनिधी,
मुंबई : शिंदे गटाची पहिली यादी नुकतीच जाहीर झाली. मात्र वरळी मतदारसंघातून शिंदे गटाचा कोण उमेदवार असणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. परंतु, शिंदे गट आणि उबाठा गट यांच्यात आरोप – प्रत्यारोपांचा सामना रंगला आहेत. एका भाषणात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटाच्या प्रवक्त्या ॲड. सुशीबेन शाह, मनसेचे संदीप देशपांडे आणि भाजपच्या शायना एनसी यांच्यावर टीका केली. दुसऱ्यांची नक्कल करून राजकीय उंची वाढत नाही, असे चोख प्रत्युत्तर शिवसेना प्रवक्त्या ॲड. सुशीबेन शाह यांनी पेडणेकर यांना दिले आहे.
वरळी मतदार संघात शिंदे गटाकडून सुशीबेन शाह या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत, अशी भावना शाह यांनी व्यक्त केली आहे. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल, असेही शाह यांनी सांगितले. किशोरी पेडणेकर तुम्हाला बॉडी बॅग खरेदी घोटाळ्यातील पैसे पचले का? दुसऱ्याची नक्कल करून तुमच्या छोट्या मालकाला खुश करण्याचा प्रयत्न करू नये. त्यांचा पराभव नक्कीच आहे. दुसऱ्याच्या व्यंगाची नक्कल करून तुम्हाला तिकीट मिळणार नाही. कोणाच्या व्यक्तिमत्त्वावर बोलल्याने राजकीय उंची वाढत नसते. त्यासाठी काम करावे लागते, परंतु आपण तर घोटाळे करता, असे खरमरतीत उत्तर शाह यांनी दिले.
आम्ही काय मुंबईकर नाही का? एक महिला असून तुम्ही महिलांचा असा हेटाळणीपूर्वक उल्लेख करत आहात, ही तुमची संस्कृती आहे का? आदित्य ठाकरेंनी कामं केली असती, तर अशा हिणकस गोष्टी करून तुम्हाला मतं मागायची वेळ आली नसती. आजही सामान्य वरळीकर समस्यांनी ग्रासलेला आहे. त्याला सध्याच्या आमदारापासून मुक्ती हवी आहे. शिंदे साहेबांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही ती देणार, असेही ॲड. सुशीबेन शाह म्हणाल्या.
ॲड. सुशिबेन शहा म्हणाल्या की, लोअर परळ येथील उड्डाणपूल बनवण्यासाठी सहा वर्षे लागली. तसेच केईएम रुग्णालय येथे न पोहोचू शकल्यामुळे कित्येक जणांचे जीव गेले आहेत. गांधीनगर येथील धोबी घाट झोपडपट्टी तोडून बारा वर्षे झाली. ना भाडे दिले ना घर दिले अजून देखील घरांपासून लोक वंचित आहेत. फिनिक्स टॉवर शेजारी शाळेसाठी राखीव जागा उपलब्ध असून देखील पाच वर्षात शाळा उभी करू शकले नाही. तसेच प्रेम नगर व सिद्धार्थ नगर येथील जनतेचे झोपडपट्टी पुनर्वसन करता आले नाही. पिढ्यान्-पिढ्या लोकांचे झोपडपट्टीमध्ये आयुष्य गेले.
कोरोना काळात किती वेळा विभागात फिरलात व वरळीच्या जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली का? तसेच हॉस्पिटलची बिल माफ केली का? विधानसभेत वरळीच्या समस्या किती वेळा मांडल्या? धारावीमध्ये अदानी विरोधात मोर्चा काढलात पण लोअर परळ ब्रिजवरील फुटपाथच्या समस्यासाठी मोर्चे काढलात का? जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार जनतेमध्ये जातो. पण आपण सर्व जनतेला मातोश्रीवर बोलवून घेतलात. कारण तुम्हाला वरळीत येण्यासाठी त्रास होऊ नये. बीडीडी चाळीतील जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्या हट्टापायी घर खाली केलं. पण तुम्ही जनतेची पार वाट लावली. आजही बिडीडी चाळीतील जनता घराच्या लॉटरीसाठी वणवण फिरत आहे. तरी देखील न्याय मिळत नाही. प्रामाणिक सांगा खरंच वरळी A+ झाली का? वरळीतील समस्यांविषयी असे अनेक प्रश्न आदित्य ठाकरे यांना ॲड. सुशीबेन शहा यांनी विचारले.