२४ ऑक्टोबर १९८९ मध्ये, टेल्कोमधील (सध्याच्या टाटा मोटर्समधील) कामगारांनी आपला संप राजन नायर नामक कामगार संघटनेच्या नेतामुळे अचानक तीव्र केला. त्यानंतर, टेल्कोचे अनेक कामगार शनिवारवाड्याजवळ संपासाठी बसले. त्यावेळी पिंपरी आणि चिंचवड येथील टेल्कोमध्ये सुमारे १३,००० कामगार कार्यरत होते. शिवाय, पिस्ता रंगाच्या सुमारे ११० बसेस पुणे व आसपासच्या परिसरात २६५ मार्गांवर तिन्ही शिफ्टमध्ये कामगारांची वाहतूक करत होत्या. यावरून त्या काळात टेल्कोचे महत्त्व किती मोठे होते, हे दिसून येते.
त्या काळात पुण्यातील सुमारे ५० ते ५५ टक्के लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या पिंपरी-चिंचवड, खडकी, भोसरी येथील लहान-मोठ्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट्सवर अवलंबून होते. त्यामुळे जर हा संप यशस्वी झाला असता, तर पुणे आणि परिणामी महाराष्ट्राची स्थिती पश्चिम बंगालप्रमाणे झाली असती.
मात्र, रतन टाटा, ज्यांनी नुकतीच टाटा समूहाची सूत्रे हाती घेतली होती, त्यांनी आपल्या सर्व कौशल्याचा वापर करून कुठलीही हिंसा होऊ न देता किंवा पिंपरी-चिंचवडमधील कोणतेही मॅन्युफॅक्चरिंग युनिट बंद पडू न देता हा संप मोडून काढला. यामुळेच रतन टाटांची टाटा सन्सवरील पकड अधिक बळकट झाली. कारण त्यावेळी रतन टाटांच्या नेतृत्वाला रुसी मोदीकडून विरोध होता. परंतु, रतन टाटांनी हा संप ज्या प्रकारे शांतपणे हाताळला, त्यानंतर रुसी मोदी यांचा विरोध ओसरला. रतन टाटा या संपाला त्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण घटना मानतात. तसेच, या घटनेमुळे पुणे आणि परिसरातील सध्याच्या समृद्धीला आकार मिळाला. जर हा संप दीर्घकाळ चालला असता, तर पुणे आणि महाराष्ट्राची भरून न येणारी हानी झाली असती.