मुंबई : मुंबईतील फिनिक्स पॅलेडियम मॉलने आपल्या दिवाळीच्या सजावटीअंतर्गत ५२ फूट उंचीचा दिवाळी कंदील सादर केला आहे. हा कंदील भारतातील सर्वात मोठा कंदील म्हणून राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करेल अशी अपेक्षा आहे. प्रसिद्ध लेखिका ट्विंकल खन्ना आणि फिनिक्स पॅलेडियमच्या संचालिका गायत्री रुईया यांच्या हस्ते या भव्य कंदीलाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच यावेळी जय वकील आणि टीच इंडिया या स्वयंसेवी संस्थांच्या मुलांच्या उपस्थितीने दिवाळीचे खरे भावविश्व प्रकट झाले.
गेल्या काही वर्षांपासून फिनिक्स पॅलेडियमने सणासुदीच्या काळात आकर्षक सजावट सादर केली आहे. यंदाही ‘व्हिज्युअल शोकेस’ या संकल्पनेअंतर्गत ‘ट्रेझर्स ऑफ इंडियासह फिनिक्स पॅलेडियमने भारताच्या कारागिरीच्या समृद्ध वारशाचा सन्मान केला आहे. यावेळी गायत्री रुईया म्हणाल्या की, फिनिक्स पॅलेडियममधील आमची दिवाळी सजावट ही केवळ सौंदर्यदृष्ट्या आकर्षक नसते, तर ती लोकांसमोर एक कथा सादर करते, जी आमच्या ग्राहकांशी भावनिकदृष्ट्या जोडलेली असते. यावर्षीच्या ‘ट्रेझर्स ऑफ इंडिया’ संकल्पनेने आम्ही आपल्या सांस्कृतिक वारसा आणि लक्झरी यांचा सुंदर मिलाफ साधला आहे.
ट्विंकल खन्ना म्हणाल्या की , माझ्यासाठी कंदील हा केवळ प्रकाशाचे प्रतीक नसून दिवाळीच्या भावनेचे मूर्त रूप आहे. हा कंदील आशा, आनंद आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. तसेच हा आपल्या घरांसह अंतःकरणही उजळवतो.