ॲड. प्रकाश आंबेडकर : अंडरवर्ल्डचे मित्र सत्तेत आले तर मुंबई पुन्हा अंडरवर्ल्डच्या ताब्यात जाईल
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला अजून एक महिना बाकी आहे. मी निवडणुकीपूर्वीच शरद पवार आणि दाऊद यांच्या भेटीचा मुद्दा महाराष्ट्र आणि संपूर्ण देशासमोर मांडला आहे. महाराष्ट्राला अंडरवर्ल्डचे राज्य हवे आहे का ?असा प्रश्न उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी असे नको असेल, तर विचारपूर्वक मतदान करण्याचे आवाहन ट्विटद्वारे केले आहे.
ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, जे गाढव विचारत आहेत की, शरद पवार आणि दाऊद इब्राहिम भेट हा 30 वर्षे जुना विषय आता का पुढे आणला आहे. त्यांच्यासाठी माझ्याकडे सरळ-सरळ उत्तर आहे की, मुंबई आणि देश धोक्यात आहे. बाबा सिद्दीकींची हत्या मुंबईचा काळा आपराधिक भूतकाळ आणि अंडरवर्ल्डचा एक फ्लॅशबॅक आहे. सगळ्यांना माहिती आहे की अंडरवर्ल्डने मुंबईत कोणाच्या मदतीने राज्य केले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला अजून एक महिना बाकी आहे. मी निवडणुकीपूर्वीच हा मुद्दा महाराष्ट्र आणि संपूर्ण देशासमोर मांडला आहे. महाराष्ट्राला अंडरवर्ल्डचे राज्य हवे आहे का ? जर नसेल तर विचारपूर्वक मतदान करण्याचे आवाहनही ॲड. आंबेडकर यांनी केले आहे.
येणारी पाच वर्षे मुंबई आणि देशासाठी खूप महत्वाची आहेत. जर अंडरवर्ल्डचे मित्र पुन्हा सत्तेत आले तर अंडरवर्ल्ड पुन्हा मुंबईवर राज्य करेल आणि देशाची सुरक्षा धोक्यात आलेली असेल असेही आंबेडकरांनी नमूद केले.