महाविकास आघाडीत बिघाडी जागावाटपाचा वाद चिघळला

News Service

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा वाद विकोपाला गेला आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील तर यापुढे बैठक होणार नाही, अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे. ठाकरे गटाने अधिकृतपणे आपली भूमिका जाहीर केली आहे. तर नाना पटोले यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्याबाबत नाना पटोले यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. संबंधित प्रश्न विचारल्यानंतप नाना पटोले तडक उठले आणि जाऊ लागले. याच वेळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नाना पटोले यांना थांबवलं. त्यानंतर पत्रकार परिषद पार पडली. राज्य पातळीवर काँग्रेसकडे निर्णय क्षमता नाही. त्यामुळे आम्हाला काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत बोलावं लागेल आणि तक्रार करावी लागेल, असं संजय राऊत म्हणाले आहेत. आता नाना पटोले असतील तर महाविकास आघाडीची बैठकच होणार नाही, असं ठाकरे गटाने जाहीर केलं आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा कसा सुटणार? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
ठाकरे गट आणि नाना पटोले यांच्यातील वाद काही नवा नाही. याआधीदेखील त्यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाले होते. संजय राऊत यांनी टीका केली होती. त्याला नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. त्यांनीदेखील बऱ्याचदा संजय राऊत यांच्यावर टीका केलेली आहे. ठाकरे गटाने पहिल्यांदाच अधिकृतपणे नाना पटोले यांच्याविरोधात उघड भूमिका जाहीर केली आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
आता वेळ खूप कमी आहे. महाराष्ट्राचे काँग्रेस नेते निर्णय घेण्यात सक्षम नाहीत, असं मला वाटतं. त्यांना वारंवार दिल्लीत लिस्ट पाठवावी लागते मग चर्चा होते. आता ती वेळ निघून गेली आहे. आमची इच्छा आहे की, लवकरात लवकर जागावाटपाचा निर्णय व्हावा. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फार काही मतभेद नाहीत. काँग्रेससोबतही नाहीयत, पण काही जागा आहेत, ज्या ठिकाणी काँग्रेस पक्ष दावा करत आहे.
नाना पटोले काय म्हणाले?
संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांना माहिती देतील, त्यांची उद्धव ठाकरे यांनी नेमणूक केली आहे. तसेच राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांची नेमणूक शरद पवारांनी केली आहे. तर आमची नेमणूक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलेली आहे. आम्ही त्यांच्याकडे बैठकीची माहिती देऊ. शेवटी सर्व पक्षांचे हायकमांडच निर्णय घेतील. संजय राऊत काय बोलत होते ते मला समजलेलं नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button