॰ भाजपा वचननामा अमलात आणणारा पक्ष तर कॉन्ग्रेस मतदारांची फसवणुक करणारा पक्ष
॰ भाजपा महायुतीच्या सरकारच्या काळात दरडोई उत्पन्नात घसघशीत वाढ, गुजरातपेक्षा जास्त दरडोई उत्पन्न
मुंबई, दि. १७ ऑक्टोबर २०२४:
भाजपा हा वचननामा अंमलात आणणारा पक्ष आहे, यावेळी भाजपा महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यावर वचननामा अंमलबजावणीकरता विषयवार समित्या नियुक्त केल्या जातील असे प्रतिपादन भाजपाचे वचननामा समितीचे अध्यक्ष ना. श्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले. महायुतीचे सरकार जनतेच्या कल्याणासाठी प्रतिबद्ध असून भाजपा महायुती सरकारच्या कारकीर्दीत राज्याच्या दरडोई उत्पन्नात भरघोस वाढ झालेली आहे, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र प्रदेश भाजपाने विधानसभा निवडणुकांकरता कफ परेड येथील जागतिक व्यापार केंद्रात सुरू केलेल्या माध्यम केंद्रात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये आणि प्रवक्ते ओमप्रकाश चौहान उपस्थित होते.
ना. श्री सुधीर मुनगंटीवार यावेळी पुढे म्हणाले की नागरिकांनी भाजपा वचननाम्याकरता त्यांच्या सूचना लवकर पाठवाव्यात. विविध स्तरावरून सूचना मागविण्यासाठी प्रदेश भाजपाच्या वचननामा समितीने सुमारे दहा हजारपेक्षा जास्त पत्रे राज्यभर पाठवली आहेत. भाजपा आपला वचननामा अंमलात आणणारा पक्ष आहे, तर कॉन्ग्रेस “प्रिंटिंग मिस्टेक झाली” असे सांगून जाहीरनाम्यातील गोष्टी टाळणारा पक्ष आहे. त्यामुळे नागरिकांनी भाजपा वचननामा समितीकडे आपल्या सूचना विश्वासाने पाठवाव्यात, असे ते म्हणाले. भाजपाने वचननाम्यातील मुद्द्यांची अंमलबजावणी करण्याकरता विषयवार अंमलबजावणी समित्या निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.
भाजपा महायुती सरकारच्या काळात राज्याच्या दरडोई उत्पन्नात भरघोस वाढ झाली असल्याचे सांगताना ना. श्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की राज्यात दरडोई सरासरी एक लक्ष ५२ हजाराची वाढ नोंदवली गेली आहे. आज राज्याचे दरडोई उत्पन्न समृद्ध गुजरातपेक्षा अधिक आहे, असेही ते म्हणाले. भाजपा जनतेच्या कल्याणासाठी प्रतिबद्ध असून राज्याला अधिकाधिक समृद्ध बनविण्याकरता कार्यरत आहे. “लाडकी बहिण” योजनेतून महिलांना दिल्या जाणाऱ्या निधीमुळे बाजारातील उलाढाल व खरेदीविक्री वाढत असून त्यामुळे राज्यासह देशाच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होत आहे, असेही ना. श्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. यापूर्वी शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग दिला तेव्हाही याहून जास्त खर्च झाला, मात्र तेव्हा कुणी आक्षेप घेतला नाही. मात्र गोरगरीबांच्या खिशात निधी जाऊ लागल्याबरोबर विरोधकांचे आक्षेप सुरू झाले, असे ते म्हणाले. “आपण सत्तेवर आलो तर लाडकी बहीण योजना त्वरीत बंद करू” असे सांगणारे विरोधक स्वतः मात्र “खटाखट पैसे” देण्याच्या वल्गना करीत होते, अशी टिका त्यांनी केली.
राज्यात विविध क्षेत्रात झालेला विकास व प्रगती जनता पाहात आहे. रस्त्यांचे जाळे विस्तारले आहे. ऊर्जा व उद्योग क्षेत्रात राज्य पुढे आहे, कृषी, दुग्धोत्पादन, मत्स्यव्यवसाय क्षेत्रातही पुढे आहे. विविध कल्याणकारी योजनांतही राज्य पुढे आहे. सांस्कृतिक क्षेत्रात राज्याने नवा ठसा उमटवला आहे, असेही ते म्हणाले.