समालखा, 19 नवम्बर, 2024:- ‘विस्तार – अनंताच्या दिशेने’ या मुख्य विषयावर आधारित 3-दिवसीय 77व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची सोमवारी 18 नोव्हेंबर रोजी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आशीर्वचनांद्वारे यशस्वीरित्या सांगता झाली. मुंबई व महाराष्ट्रातून समागमामध्ये सहभागी झालेले सुमारे एक लाख भाविक भक्तगण समागमाचा भरपूर आनंद प्राप्त करुन आपापल्या निवासस्थानी परतू लागले आहेत. समालखा (हरियाणा) येथे निरंकारी आध्यात्मिक स्थळाच्या सुमारे 650 एकरांच्या विशाल मैदानावर आयोजित या समागमामध्ये देश-विदेशातील लाखो भाविक-भक्तगण सहभागी झाले होते.
सत्याला जाणून भ्रमांपासून मुक्ती मिळवा
समागमाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी सायंकाळी उपस्थित विशाल मानव परिवाराला संबोधित करताना सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज म्हणाल्या, की जगामध्ये आपण जेवढ्या वस्तू किंवा पदार्थ पाहत व अनुभवत आहोत त्या सर्व परिवर्तनशील आहेत. त्यापैकी कोणत्याही गोष्टीला शाश्वत सत्य मानले जाऊ शकत नाही. जसे सूर्य मावळतो तेव्हा रात्र होते आणि रात्र सरली की पुन्हा सूर्योदय होतो. बालक म्हणून जन्माला आलेला मनुष्य हळू हळू शरीराच्या आकारात बदल घडून वृद्धत्वाकडे झुकतो. अशा तऱ्हेने प्रकृतीच्या कोणत्याही वस्तूचे अस्तित्व शाश्वत मानणे हा आपला भ्रम आहे. कारण सत्य केवळ एक निराकार परमात्मा आहे ज्याला विविध नावांनी पुकारले जाते. या सदोदित एकरस व अविनाशी परम सत्याला जाणून आपण भ्रमांपासून मुक्ती प्राप्त करु शकतो.
निरंकारी राजपिता जी यांचे संबोधन
तत्पूर्वी, निरंकारी राजपिता रमित जी यांनी आपल्या विचारांमध्ये सांगितले, की 77व्या समागमामध्ये भाग घेणे ही भाविक भक्तगणांसाठी एक अनोखी पर्वणी आहे. हा समागम जीवनाला सखोलता आणि विस्तार प्रदान करत आहे. सद्गुरुंच्या शिकवणूकीने मानवी अस्तित्वाला असीम आणि गौरवशाली केले आहे. भक्ती केवळ साधन नसून साध्यही आहे. सतगुरुंकडून प्रदत्त आध्यात्मिकता आमचे विचार, आमची दृष्टि, आमचे प्रेम, सेवा, समर्पण, करूणा व अन्य दिव्य गुणांचा विस्तार करते.
अनंताशी नाते जोडून जीवनाच्या प्रत्येक पैलूचा सकारात्मक विस्तार करा
सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी तीन दिवसीय 77व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या समापन दिवशी लाखोंच्या संख्येने उपस्थित भाविक भक्तगणांना संबोधित करताना सतगुरु माताजी म्हणाल्या, की परमात्मा अनंत आहे आणि त्याच्याशी जोडली जाणारी प्रत्येक गोष्ट अनंत होऊ लागते. ब्रह्मज्ञानाद्वारे परमात्म्याला जाणून जेव्हा आपण त्याच्याशी नाते जाडतो तेव्हाच या दिव्य यात्रेचा प्रारंभ होतो ज्यायोगे आमच्या जीवनातील प्रत्येक पैलूचा सकारात्मक विकास होऊ लागतो.
सतगुरु माताजी पुढे म्हणाल्या, की अज्ञानतेमुळे जगामध्ये भेदभावाची कित्येक कारणे शोधली जातात. आजकाल तर जाती-पाती व्यतिरिक्त जीवन शैली, शहरी अथवा ग्रामीण भागातील निवासी किंवा उच्चभ्रू व सामान्य वस्त्यांतील रहिवाशी अशा कारणांनी लोक भेदभाव करु लागले आहेत. त्याच वेळी दुसऱ्या बाजुला ब्रह्मज्ञानी संत परमात्म्याला जीवनाचा आधार मानून सहजपणे संकुचित भावनांच्या पलीकडे जाऊन समदृष्टीची सुंदर भावना धारण करत आहेत.
कवि दरबार
संत समागमाच्या तिसऱ्या दिवसाचे मुख्य आकर्षण होते एक बहुभाषी कवी दरबार ज्यामध्ये देशविदेशातून आलेल्या जवळपास 19 कविंनी ‘विस्तार – अनंताच्या दिशेने’ या विषयावर आधारित हिंदी, पंजाबी, मुलतानी, हरियाणवी व इंग्रजी भाषांमध्ये आपल्या प्रेरणादायी काव्य रचना सादर केल्या ज्याची उपस्थित श्रोत्यांनी खूप प्रशंसा केली.
उल्लेखनीय आहे की यावर्षी समागमाच्या पहिल्या दिवशी आयोजित बाल कवी दरबारमध्ये बाल कविंनी विविध भाषांमध्ये काव्य पाठ केला. बालकांची अद्भुत काव्य प्रतिभा पाहून श्रोत्यांनी त्यांचे तोंडभरुन कौतुक केले. या व्यतिरिक्त समागमाच्या दुसऱ्या दिवशी महिला कवि दरबारदेखील आयोजित करण्यात आला ज्यामध्ये अनेक कवयित्री भगिनींनी वेगवेगळ्या भाषांमध्ये आपापल्या कविता सादर केल्या ज्याची श्रोत्यांनी स्तुति केली.
संत समागमाच्या या पावन पर्वणीचा भरपूर आनंद व दिव्य शिकवण आपल्या हृदयांमध्ये धारण करुन भाविक भक्तगण आज आपापल्या गन्तव्य स्थानाकडे रवाना झाले.
समागमाची काही क्षणचित्रे
निरंकारी प्रदर्शनी
यावर्षीचा समागमाचा मुख्य विषय ‘विस्तार-अनंताच्या दिशेने’ यावर आधारित निरंकारी प्रदर्शनी समस्त भाविक भक्तगणांसाठी आकर्षणाचे केंद्र बनून राहिली. या दिव्य प्रदर्शनीला तीन भागात विभाजित करण्यात आले असून त्यापैकी पहिल्या भागात मिशनचा इतिहास, विचारधारा व सामायिक उपक्रमांच्या व्यतिरिक्त सतगुरुंनी देश-विदेशात केलेल्या दिव्य कल्याणकारी प्रचार यात्रा यांची विस्तृत माहिती देण्यात आली होती. दुसऱ्या भागात संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनने मिशनच्या आरोग्य व समाजकल्याण विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या सर्व उपक्रमांना दर्शविण्यात आले होते. तिसऱ्या भागात बाल प्रदर्शनी फारच कलात्मक व प्रेरणादायक रुपात बाल संतांनी प्रदर्शित केलेली होती ज्याचा समस्त भाविकांनी आनंद घेतला.
लंगर
प्रतिवर्षाप्रमाणे समागमामध्ये सर्वांसाठी मोफत लंगरची व्यवस्था समागमाच्या चारही मैदानांवर करण्यात आली होती. त्यामध्ये विविध सांस्कृतिक व धार्मिक पार्श्वभूमीतून आलेले भक्तगण एकत्र बसून कोणत्याही भेदभावाविना महाप्रसाद ग्रहण करत होते ज्यातून ‘सारा संसार – एक परिवार’चे मनमोहक दृश्य परिलक्षीत होत होते. दिव्यांग व शारीरिकदृष्ट्या वयोवृद्ध व्यक्तींसाठी लंगरमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली होती. पर्यावरणच्या दृष्टिकोणातून सर्वांना स्टीलच्या ताटांमध्ये लंगर वाढण्यात येत होते. लंगरमध्ये स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले गेले होते.
कायरोप्रॅक्टिक शिविर एवं स्वास्थ्य सुविधाएं
77व्या निरंकारी संत समागमात कैरोप्रॅक्टिक तंत्राद्वारा द्वारे निःशुल्क स्वास्थ्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यत: या तंत्राने पाठीच्या कण्याच्या दुखण्यांवर इलाज केला जातो. या शिबिरात दररोज सुमारे तीन ते चार हजार भक्तगण उपचार घेत होते. अमेरिका, यूनाईटेड किंगडम, कॅनडा, स्पेन, फ्रान्स व भारत या देशांतील सुमारे 25 डॉक्टरांची टीम डॉ.जिम्मी नंदा यांच्या नेतृत्वाखाली समागम ग्राउंडवर आपल्या सेवा देत होते. या व्यतिरिक्त समागम स्थळावर एक 100 बेडचे तात्पुरते हॉस्पिटल उभारण्यात आले होते ज्यामध्ये आयसीयूची व्यवस्थादेखील करण्यात आली होती. शिवाय होमियोपॅथी व फिजियोथेरपीचीही व्यवस्था करण्यात आली होती.