मुंबई परिसरातील आरोग्यसंपन्न उपक्रमामुळे वंचित वस्त्यांमधील बालकुपोषणात ८५ टक्‍के घट

News Service

मुंबई, 6 एप्रिल २०२६: टाटा मोटर्स फाऊंडेशनच्या आरोग्यसंपन्न उपक्रमाने गंभीर आणि मध्यम बालकुपोषणात ८५ टक्‍के घट संपादित करत आर्थिक वर्ष २०२६ मध्ये मुंबई परिसरातील चेंबूर आणि वाशीनाका येथील १,००० हून अधिक मुलांच्या जीवनात सकारात्मक प्रभाव घडवून आणला आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील वंचित वस्त्यांमध्ये राबवण्यात आलेल्‍या या उपक्रमामधून शाश्वत समुदाय-आधारित पोषण आणि माता आरोग्य उपक्रमांद्वारे कुपोषणाशी लढता येते, हे निदर्शनास येते. हे यश जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आरोग्य समानता आणि प्रतिबंध या जागतिक उद्दिष्टांशी सुसंगत आहे.

निर्मया फाउंडेशनसोबत सहयोगाने विकसित केलेला टाटा मोटर्सचा आरोग्यसंपन्न उपक्रम महिला आणि बालकांच्या आरोग्याकरिता सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक प्रबळ करण्यासाठी, बालकुपोषणाची समस्या सोडवण्यासाठी, तसेच हा उपक्रम शाश्वत करण्याकरिता व्‍यक्तींच्‍या वर्तणुकीत बदल घडवून आणण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. २०२१ पासून हा उपक्रम प्रामुख्याने स्थलांतरित लोकसंख्या असलेल्या भागातील एक लाखांहून अधिक घरांपर्यंत पोहोचला आहे, जिथे लोकांचे उत्पन्न अनिश्चित आहे आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची उपलब्‍धता मर्यादित आहे.

चेंबूरसारख्या दाट लोकवस्तीच्या भागात नवजात बालक आणि तान्‍ह्या बाळांचे आरोग्य, तसेच गरोदर आणि नवीन मातांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. जागरूकता व पाठबळाच्या अभावामुळे तरुण माता अनेकदा अनियमित स्तनपान आणि नवजात बालकांना साखरेचे पाणी देण्यासारख्या असुरक्षित आहार पद्धतींचा अवलंब करतात. या वस्‍तुस्थितीमधून मातांची काळजी आणि पोषणविषयक जागरूकतेमधील गुंतागुंतीच्‍या त्रुटी दिसून येतात, ज्या या वंचित समुदायांमध्ये कुपोषणास कारणीभूत ठरत आहेत.

हा उपक्रम प्रतिबंधात्मक आणि समुदाय-केंद्रित दृष्टिकोनाचा अवलंब करतो, ज्यामध्ये बालकांचे पोषण, प्रसूतीपूर्व व प्रसूतीपश्चात काळजी यावर पालकांसाठी वैयक्तिक समुपदेशन आणि गट सत्रांचा समावेश आहे. हा प्रकल्प बालकांसाठी ओपीडीची व्‍यवस्‍था करतो समुदाय आरोग्य ग्रंथालये स्थापन करतो आणि सरकारी आरोग्य यंत्रणांशी सक्रियपणे समन्वय साधतो, ज्‍याद्वारे शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचे काम करतो.

बालआरोग्याच्या पलीकडे जात आरोग्यसंपन्न उपक्रम यावर्षी आरोग्य शिबिरे, पोषण आणि वर्तणूक बदलाच्या उपक्रमांच्‍या माध्‍यमातून जवळपास १०,००० समुदाय सदस्यांपर्यंत पोहोचला आहे. हा उपक्रम गरोदर महिलांना सरकारी आरोग्य व पोषण योजनांमध्ये नावनोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करतो आणि लसीकरण अपूर्ण असलेल्‍या बालकांना लसीकरणासाठी संदर्भित करतो.
आपल्या पीअर ग्रुप डेव्हलपमेंट मॉडेलच्‍या माध्‍यमातून हा उपक्रम समुदायातील प्रमुखांना प्रशिक्षित करतो, ज्‍यामुळे जागरूकता वाढवून समाजात मालकीची भावना निर्माण होईल आणि समुदाय स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी स्वतः घेऊ शकतील.

या उपक्रमाबाबत मत व्‍यक्त करत टाटा मोटर्स फाऊंडेशनचे सीईओ विनोद कुलकर्णी म्‍हणाले, “शहरातील वस्‍त्‍यांमधील व्‍यक्तींना पोषण, आरोग्य सेवांची मर्यादित उपलब्धता आणि जागरूकतेचा अभाव यांसारख्या एकमेकांशी संबंधित असलेल्या आव्हानांचा सामना करावा लागतो. बालकुपोषणाची समस्या सोडवणे, समाजात जागरूकता निर्माण करणे आणि सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक उपलब्‍ध करून देणे या उद्देशाने आरोग्‍यसंपन्न उपक्रमाची संकल्‍पना मांडण्‍यात आली आहे. ट्रॉम्बे आणि वाशी येथे या उपक्रमाला मिळालेल्‍या यशामधून आमचा विश्वास अधिक दृढ झाला आहे की, आरोग्यविषयक उपक्रम स्थानिक समुदायावर आधारित, सातत्यपूर्ण आणि सरकारी यंत्रणांसोबत सहयोगाने राबवले जातात, तेव्हा व्‍यक्तींच्या वर्तणुकीत सकारात्मक बदल घडवणे शक्य असते.”

आरोग्यसंपन्नद्वारे मिळालेल्‍या निष्‍पत्तींमधून निदर्शनास येते की, अत्यंत गरजू शहरी समुदायांमध्ये बालकांचे पोषण आणि मातांचे आरोग्य सुधारण्यासाठी स्थानिक स्तरावरील उपक्रम प्रभावी ठरू शकतात. हा प्रकल्प तळागाळातील आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी अनुकरणीय आणि विस्तारण्यायोग्य मॉडेल सादर करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button