- या वर्षी 9,600 हून अधिक अर्जांमधून 520 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली, ज्यामध्ये 20 दिव्यांग (पीडब्ल्यूडी) विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
- आतापर्यंत अल्प उत्पन्न गटातील 3,100 हून अधिक विद्यार्थ्यांना सक्षम केले आहे, यामध्ये 52 टक्के विद्यार्थिनी आहेत, तसेच सर्व लाभार्थ्यांना सर्वांगीण पाठबळ देण्यात आले आहे.
- दीर्घकालीन यशासाठी पूर्ण आर्थिक सहाय्य, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि करिअरसाठी आवश्यक प्रशिक्षण यांसह सर्वसमावेशक मदत दिली जाते.
भारत: भावी अभियंत्यांना सक्षम करण्याच्या आपल्या प्रवासाची दोन दशके साजरी करत कमिन्स इन इंडिया या आघाडीच्या एकीकृत ऊर्जा सोल्यूशन्स प्रदाता कंपनीने आज आपल्या ‘नर्चरिंग ब्रिलियन्स’ या प्रमुख उपक्रमाचा 20वा वर्धापन दिन साजरा केला. यानिमित्त 520 नवीन गुणवंत विद्यार्थ्यांच्या समूहाला या उपक्रमात सामील करून घेण्यात आले. हा उपक्रम कमिन्स इंडिया फाउंडेशनच्या माध्यमातून राबवला जातो. या अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीचे पदविका (डिप्लोमा) आणि पदवी शिक्षण पूर्ण करण्यासाठी, तसेच भविष्याकरिता सुसज्ज करिअर घडवण्यासाठी शिष्यवृत्ती आणि मार्गदर्शनाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. पुण्यातील कमिन्स इंडिया कॅम्पसमध्ये आयोजित विशेष सोहळ्यामध्ये कमिन्स इंडिया लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालिका श्वेता आर्या आणि कमिन्स इन इंडियाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी आशिष अग्रवाल यांच्या हस्ते 2025-26 वर्षातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

या वर्षी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, जिथे 9,600 हून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी राबवण्यात आलेल्या अत्यंत कडक निवड प्रक्रियेनंतर 520 पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये 20 दिव्यांग विद्यार्थ्यांचाही समावेश आहे, ज्यामधून या उपक्रमाची समानता आणि समावेशकतेप्रती असलेली कटिबद्धता दिसून येते. ‘नर्चरिंग ब्रिलियन्स’ उपक्रमाने आतापर्यंत 3,100 हून अधिक विद्यार्थ्यांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकला आहे. विशेष म्हणजे, यामध्ये 52 टक्के विद्यार्थिनी लाभार्थी आहेत आणि या उपक्रमाने त्यांना प्रबळ व शाश्वत करिअर घडवण्यासाठी सक्षम केले आहे.
या प्रसंगी मत व्यक्त करत श्वेता आर्या, रिजनल लीडर, कमिन्स इंडिया आणि मॅनेजिंग डायरेक्टर, कमिन्स इंडिया लिमिटेड म्हणाल्या, “खऱ्या प्रगतीचे मोजमाप प्रगती आणि वाढीसाठी निर्माण केलेल्या अर्थपूर्ण संधीवरून केले जाते. गेल्या दोन दशकांपासून ‘नर्चरिंग ब्रिलियन्स’ उपक्रम विद्यार्थ्यांच्या महत्त्वाकांक्षांमध्ये त्यांच्या परिस्थितीची मर्यादा कधीही अडथळा येणार नाही याची खात्री घेत आहे. शिक्षण हे मानवी प्रगती आणि राष्ट्रनिर्मितीचे शक्तिशाली साधन आहे. कमिन्समध्ये आम्ही विद्यार्थ्यांच्या महत्त्वाकांक्षांना संधींशी जोडतो, ज्यामुळे पात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या पूर्ण क्षमतेची जाणीव होऊ शकते. आजच्या विद्यार्थ्यांना सक्षम करून हा उपक्रम भावी नवप्रवर्तक व प्रमुख घडवण्यास मदत करत आहे.”
सर्वांगीण विकासाचे व्यासपीठ म्हणून डिझाइन केलेला कमिन्स इंडियाचा ‘नर्चरिंग ब्रिलियन्स’ उपक्रम फक्त आर्थिक मदतीपुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे सहकार्य देतो. शिक्षण शुल्क, शैक्षणिक खर्च आणि अभ्यासाची साधने उपलब्ध करून देण्यासोबत हा उपक्रम दीर्घकालीन यशासाठी आवश्यक असलेल्या क्षमता विकसित करण्यावर भर देतो. गुणवंत विद्यार्थ्यांना कमिन्सच्या अनुभवी नेतृत्वाकडून पद्धतशीर मार्गदर्शन, उद्योगाचा प्रत्यक्ष अनुभव आणि सॉफ्ट स्किल्स, रोजगारक्षमता व करिअर सज्जतेसाठी खास प्रशिक्षण दिले जाते. हा उपक्रम विद्यार्थी आणि मार्गदर्शकांचे प्रबळ व शाश्वत नेटवर्क तयार करतो, ज्यामुळे निरंतर शिक्षण, ज्ञानाची देवाणघेवाण आणि व्यावसायिक वाढ शक्य होते.
2006 मध्ये फक्त 13 विद्यार्थ्यांसह पुण्यातून सुरू झालेला ‘नर्चरिंग ब्रिलियन्स’ उपक्रम आज राष्ट्रीय आणि डिजिटल सक्षम व्यासपीठात रूपांतरित झाला आहे. हा उपक्रम आज पुणे, फलटण, अहिल्यानगर, इंदौर, जमशेदपूर, धाराशिव, विदिशा, गुना आणि रांची यांसारख्या देशातील प्रमुख औद्योगिक केंद्रांमधील तरुण अभियंत्यांसाठी त्यांच्या महत्त्वाकांक्षेला संधींमध्ये बदलण्याचे मार्ग निर्माण करत आहे.