भारतातील उत्पादन क्षमतेचा विस्तार वेगवान करणार
पुणे, भारत, मे १८, २०२६: जीई एरोस्पेसने आज आपल्या पुणे येथील उत्पादन प्लांटमध्ये १०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली. यामुळे कंपनीचा भारतातील उत्पादन विस्तार अधिक दृढ होईल, ज्यासह देशाप्रती असलेली दीर्घकालीन कटिबद्धता अधिक प्रबळ झाली आहे. ही गुंतवणूक वेल्डिंगचे नवीन तंत्रज्ञान, प्रगत तपासणी उपकरणे, अचूक साधने, गेजेस, फिक्स्चर्स आणि अतिरिक्त पायाभूत सुविधांच्या सुधारणेसाठी वापरली जाईल. उत्पादन क्षमता वाढवणे, प्रक्रिया अचूक करणे आणि जगभरातील ग्राहकांसाठी उच्च-गुणवत्तेचे कम्पोनण्ट्स पुरवणे हा यामागचा उद्देश आहे.
ही गुंतवणूक गेल्या दोन वर्षांत जाहीर केलेल्या ४१० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीवर आधारित आहे. यामुळे तीन वर्षांच्या कालावधीत जीई एरोस्पेसची पुणे प्लांटमधील एकूण गुंतवणूक ५१० कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. याआधीची गुंतवणूक प्रामुख्याने उत्पादन प्रक्रिया प्रगत करणे, ऑटोमेशन आणि नेक्स्ट-जनरेशन इंजिन कम्पोनण्ट्ससाठी क्षमता वाढवण्यावर केंद्रित होती. नव्या सुधारणांमुळे या सुविधेच्या क्षमतांचा अधिक विस्तार होईल आणि जीई एरोस्पेसच्या जीई९०, जीईएनएक्स, जीई९एक्स आणि सीएफएम इंटरनॅशनलच्या लीप (LEAP) इंजिन प्रोग्राम्ससाठी लागणाऱ्या कम्पोनण्टच्या उत्पादनास पाठबळ मिळेल.
“या सातत्यपूर्ण गुंतवणूकीमधून जीई एरोस्पेसची भारताप्रती असलेली दीर्घकालीन कटिबद्धता आणि आमच्या जागतिक उत्पादन नेटवर्कमध्ये पुणे प्लांटच्या भूमिकेबद्दलचा आमचा विश्वास दिसून येतो,” असे जीई एरोस्पेसच्या पुणे उत्पादन प्लांटचे व्यवस्थापकीय संचालक विश्वजित सिंग म्हणाले. “आमची ही निरंतर वाढ आमचे ग्राहक आणि व्यापक समुदायासाठी फायदेशीर आहे, ज्यामुळे जीई एरोस्पेस आणि आमच्या पुरवठादार भागीदारांकडे अॅप्रेन्टिसशिप आणि रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होत आहेत. गेल्या दशकात, हा प्लांट उच्च-क्षमतेच्या एरोस्पेस मॅन्युफॅक्चरिंग हबमध्ये विकसित झाला आहे, ज्यामुळे भारतातील पुरवठादार परिसंस्था दृढ झाली असून जीई एरोस्पेसच्या जागतिक पुरवठा साखळीत मोलाचे योगदान मिळत आहे.”
जीई एरोस्पेसचे पुणे उत्पादन प्लांट कंपनीच्या जागतिक पुरवठा साखळीचा महत्त्वाचा भाग आहे., या प्लांटमध्ये व्यावसायिक विमान इंजिनांसाठी लागणारे महत्त्वपूर्ण कम्पोनण्ट्स तयार केले जातात. हा प्लांट भारतातील २,२०० हून अधिक जीई एरोस्पेस पुरवठादारांच्या व्यापक नेटवर्कमधील ३०० हून अधिक स्थानिक पुरवठादारांसोबत काम करतो. प्रगत उत्पादन कौशल्य आणि अचूक अभियांत्रिकी क्षमतांच्या माध्यमातून जागतिक एरोस्पेस प्रोग्राममध्ये भारताची भूमिका प्रबळ करण्यास यामुळे मदत होत आहे. तसेच, हा प्लांट कर्मचारीवर्ग विकासामध्ये देखील महत्त्वाची भूमिका बजावतो. येथील दोन वर्षांच्या संरचित अॅप्रेन्टिसशिप प्रोग्रामांतर्गत दरवर्षी ५०० हून अधिक प्रशिक्षणार्थींना वर्गातील शिक्षण आणि प्लांटच्या समर्पित वेल्ड स्कूलद्वारे विशेष टीआयजी वेल्डिंग प्रशिक्षण दिले जाते. २०१५ पासून, या प्लांटने ५,००० हून अधिक उत्पादन सहकाऱ्यांना प्रशिक्षित केले आहे, ज्यामुळे भारतात एरोस्पेस उत्पादन क्षेत्रातील प्रतिभावान मनुष्यबळ तयार होण्यास मदत झाली आहे. अलीकडील समुदाय व मनुष्यबळ विकास अनुदानांनी या प्रदेशातील तांत्रिक शिक्षण आणि कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करणाऱ्या उपक्रमांनाही पाठबळ दिले आहे.
आजची ही घोषणा जीई एरोस्पेसच्या भारताप्रती असलेल्या व्यापक कटिबद्धतेला अधिक दृढ करते, जिथे कंपनी विमानांच्या भविष्याला आकार देण्यासाठी उत्पादन, अभियांत्रिकी आणि पुरवठा साखळी विकासात गुंतवणूक करणे सुरूच ठेवत आहे.
*सीएफएम इंटरनॅशनल ही जीई एरोस्पेस आणि सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन्स यांच्यातील ५०-५० भागीदारी असलेली संयुक्त कंपनी आहे.