कोक स्टुडिओ भारतने ‘कचौडी गली’मधून पत्नीच्या नजरेतून मांडली एका विस्मरणात गेलेल्या युद्धाची कथा

News Service

राष्ट्रीय, मे २०, २०२६: कोक स्टुडिओ भारत आपल्या सीझन ४ मधील तिसऱ्या गाण्यासह परत आला आहे. यावेळी हा प्रवास बनारसच्या गल्लीबोळांमधून ‘कचौडी गली’पर्यंत पोहोचला आहे, जे पहिल्या अँग्लो-बर्मी युद्धातील विस्मरणात गेलेल्या मानवी हानीने प्रेरित असलेले एक लोकगीत आहे.

या गाण्याची सुरुवात कचौडी गलीमध्ये होते, जिथे एक स्त्री तिच्या पतीला ब्रिटीश सैन्याद्वारे ओढून नेले जात असताना पाहते; त्याला मिर्झापूरमधून खेचून रंगून (यांगून, म्यानमार) येथे अशा युद्धासाठी पाठवले जात आहे, जे त्याने कधीच निवडले नव्हते. तिचा आवाज दुःख, संताप आणि अचानक रिकाम्या झालेल्या घराचे ओझे व्यक्त करतो. हा आवाज इतका जिव्हाळा असलेला, स्थानिक आणि मातीशी जोडलेला आहे, जो फक्त लोकसंगीतात असू शकतो. तिला जे जाणवत आहे तेच एकेकाळी हजारो सामान्य कुटुंबांना जाणवले होते: अशी हानी ज्याची इतिहासपुस्तकात कधीच नोंद झाली नाही, पण जी बनारससारख्या शहरांच्या अरुंद गल्ल्यांमध्ये वर्षानुवर्षे शांतपणे जिवंत राहिली.

ही कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तीन वेगळे आवाज एकत्र आले आहेत. रेखा भारद्वाज, ज्यांच्या आवाजाने प्रदीर्घ काळापासून विरह आणि बंडखोरीचे भाव तितक्याच ताकदीने सांभाळले आहेत. त्यांनी या गाण्याला एका भावनिक अधिकारासह मुख्य आधार दिला आहे. उत्पल उदित यांनी या निर्मितीला अस्सल लोकसंगीत स्पर्श दिला आहे, ज्यामुळे गाण्याची मूळ भावना कुठेही कमी न होता टिकून राहते. ख्वाब या गाण्यात एका शांत तणावाच्या धाग्यासारखे विणले गेले आहेत, जे दुःखाची भावना अधिक गडद करतात, पण त्याचा मूळ गाभा हरवू देत नाहीत.

कोका-कोला इंडिया आणि साउथवेस्ट एशियाचे आयएमएक्स (इंटिग्रेटेड मार्केटिंग एक्सपिरियन्स) लीड शंतनू गांगणे म्हणाले, “लोकसंगीताची सर्वात रोमांचक गोष्ट म्हणजे ते आठवणींना अत्यंत नैसर्गिक पद्धतीने जिवंत ठेवते. भोजपुरीमध्ये कथाकथनाची एक समृद्ध परंपरा आहे, जी काळाच्या ओघात मुख्य प्रवाहातून हळूहळू नाहीशी झाली आहे. कोक स्टुडिओ भारतच्या माध्यमातून या हरवलेल्या कथा आणि संस्कृतींना पुन्हा चर्चेत आणण्याचा आमचा प्रयत्‍न आहे. ‘कचौडी गली’ हे याच दृष्टिकोनाचे सशक्त उदाहरण आहे: एक पूर्णपणे स्थानिक कथा, जी रेखा भारद्वाज, उत्पल उदित आणि ख्वाब यांच्या वेगळ्या आवाजातून आणि सर्जनशील प्रतिभेतून अशा प्रकारे मांडली गेली आहे की, जी चिरंतन आणि आधुनिक दोन्ही वाटते.”

रेखा भारद्वाज म्हणाल्या, “‘कचौडी गली’ हे एका अतिशय विशिष्ट भावनिक पातळीवर आधारलेले आहे. हे युद्धाबद्दल नाही, तर युद्ध तुमच्याकडून काय हिरावून घेते याबद्दल आहे. आम्ही तो जिव्हाळा टिकवून ठेवण्याचा आणि भावना प्रामाणिकपणे समोर आणण्याचा प्रयत्‍न केला. कोक स्टुडिओ भारतसोबत हे काम करताना मला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे, इतक्या मोठ्या प्रमाणावर निर्मिती असूनही हे गाणे मनाला अगदी जवळचे वाटते.”

उत्पल उदित म्हणाले, “साऊंडच्‍या माध्यमातून गाण्याचे विश्व उभे करणे हा यातील रंजक भाग होता. गाण्याच्या निर्मितीमधील बरीचशी मदत छोट्या-छोट्या गोष्टींमधून मिळाली: जसे त्यातील ठहराव, संयम आणि काही ठिकाणचा राकटपणा. माझ्यासाठी गाणे भोजपुरी लोकसंगीताशी प्रामाणिक राहणे आणि त्याद्वारे या लोकसंगीताची भाषा व संस्कृती परत आणणे महत्त्वाचे होते. कोक स्टुडिओ भारतने ही भावना ओळखली आणि याच कारणामुळे हे गाणे अशा प्रकारे आकारास आले.”

ख्वाब म्हणाले, “कोक स्टुडिओ भारत नेमके हेच करतो – अत्यंत स्थानिक गोष्ट, एक गल्ली, एक बोलीभाषा, आणि असे युद्ध ज्याबद्दल आता कोणी बोलत नाही, अशा विषयांना अशी निर्मिती आणि व्यासपीठ मिळवून देतो, ज्यामुळे संपूर्ण जग ते ऐकू शकते. ‘कचौडी गली’ने मला शिकवले की सर्वात छोट्या तपशीलांमध्येही सर्वात जास्त भावना दडलेल्या असतात आणि ही भावना समोर आणण्यासाठी हे अगदी योग्य ठिकाण होते.”

‘कचौडी गली’च्या माध्यमातून कोक स्टुडिओ भारत सीझन ४ ने पिढ्यानपिढ्या लोकसंगीताबाबत आठवणी, प्रादेशिक संगीत आणि मौखिक परंपरेद्वारे जिवंत राहिलेल्या कथांचा शोध घेणे सुरूच ठेवले आहे. ‘ऐ अजनबी’ आणि ‘बुल्लेया वे’ या गाण्यांनंतर हा सीझन समकालीन कलाकार, साऊंड आणि सहकार्यांद्वारे आजच्या प्रेक्षकांसाठी स्थानिक कथांना पुन्‍हा सादर करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button