सचिन यांचा गुणवत्तेचा वारसा आणि लोकप्रियता बँकेच्या सर्वात विश्वासार्ह बँकांपैकी एक असण्याच्या प्रतिष्ठेशी अनुरूप
बँकेच्या स्थित्यंतराच्या प्रवासातला नवा टप्पा सुरू
विविध प्रकारच्या सेवा देणारे ‘बीओबी मास्टरस्ट्रोक बचत खाते’ लाँच
मुंबई, ७ ऑक्टोबर २०२४ – बँक ऑफ बरोडा या भारतातील सर्वात विश्वासार्ह आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या बँकांपैकी एका बँकेने आज क्रिकेट क्षेत्रातील लेजंड सचिन तेंडुलकर यांची बँकेच्या जागतिक ब्रँड अम्बेसिडरपदी नियुक्ती जाहीर केले आहे. सचिन तेंडुलकर आणि बँक ऑफ बरोडा यांच्यातील ही धोरणात्मक भागिदारी गुणवत्ता आणि विश्वास या समान मूल्यांवर आधारित आहे. ही भागिदारी योग्य वेळेत झाली आहे असे म्हणता येईल, कारण बँक ऑफ बरोडाचा स्थित्यंतराच्या दिशेने प्रवास सुरू असून आता सचिन तेंडुलकर यांच्या लोकप्रियतेच्या मदतीने बँकेचा विकासाच्या मार्गावर अधिक वेगवान प्रवास सुरू होईल.
बँक ऑफ बरोडाने सचिन यांचा समावेश असलेले ‘प्ले द मास्टरस्ट्रोक’ हे नवे कॅम्पेन सुरू केले आहे. हे कॅम्पेन लोकांना लाखो लोकांचा विश्वास असलेली आणि जवळपास शतकभराचा वारसा लाभलेल्या बँकेची निवड करून मास्टरस्ट्रोक खेळण्यासाठी प्रोत्साहन देणारे आहे.
देशभरातील विविध भौगोलिक प्रदेश आणि लोकसंख्येमध्ये लोकप्रिय असलेले सचिन बँक ऑफ बरोडाचे ब्रँड अम्बेसिडर या नात्याने बँकेचे सर्व ब्रँडिंग कॅम्पेन, ग्राहक शिक्षण, आर्थिक साक्षरता व फसवणुकीविषयी जागरूकता घडवणारे उपक्रम आणि कर्मचारी संवाद उपक्रम यामध्ये सहभागी होतील. बँक ऑफ बरोडा सध्या १७ देशांत कार्यरत असून जागतिक क्रीडा आयकॉन या नात्याने सचिन यांची साथ बँक ऑफ बरोडा ब्रँडला आंतरराष्ट्रीय स्तरावर नव्या उंचीवर नेईल.
या भागिदारीविषयी बँक ऑफ बरोडाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. देवदत्त चंद म्हणाले, ‘सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूची बँक ऑफ बरोडाच्या जागतिक ब्रँड अम्बेसिडरपदी नियुक्तीचा हा क्षण आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. सचिन हे जागतिक आयकॉन आहेत आणि त्यांनी कायम मैदानात आणि मैदानाबाहेरही आदर्श घालून दिला आहे. आपल्या असामान्य करियरने संपूर्ण देशाला प्रेरणा देणाऱ्या सचिन यांच्याप्रमाणेच बँक ऑफ बरोडाही देशातील लाखो लोकांसाठी विश्वासार्ह बँकिंग भागीदार आहे व त्यांना आपली आर्थिक स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पाठिंबा देत आहे. सचिन हे नेतृत्व, गुणवत्ता, विश्वास, सातत्य आणि वारशाचे प्रतीक असून ते कित्येक पिढ्यांना प्रेरणादायी ठरले आहे. बँक ऑफ बरोडाचा गेल्या शतकभराचा प्रवासही त्याच मूल्यांवर आधारित आहे. आम्हाला सचिन यांच्यासह भागिदारी करत हे नाते प्रत्यक्षात आणताना आनंद होत आहे.’
बँकेने ‘बीओबी मास्टरस्ट्रोक बचत खाते’ हे खास बचत खाते लाँच केले असून प्रीमियम सेवा हवी असणाऱ्यांसाठी ते खास तयार करण्यात आले आहे. ‘बीओबी मास्टरस्ट्रोक बचत खाते’ सर्वोत्तम वैशिष्ट्यांवर भर देणारे, विश्वासार्ह आणि उत्पादन व डिझाइनमध्ये दीर्घकालीन आर्थिक नियोजनाचा समावेश करणारे आहे.
उच्चभ्रू ग्राहकांसाठी बँकेच्या सर्वोच्च सेवा उपलब्ध करणाऱ्या या बचत खात्यासह विविध सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामध्ये खात्यातील बाकीवर फ्लेक्सी फिक्स्ड डिपॉझिट सेवेद्वारे सर्वोच्च व्याजदर, सर्व रिटेल कर्जांवर सवलतीत आरओआय, बीओबी वर्ल्ड ऑप्युलन्स व्हिसा इन्फनाइट डेबिट कार्ड (मेटल एडिशन) आणि कायमस्वरूपी एटर्ना क्रेडिट कार्ड (पात्रतेनुसार) यांचा समावेश आहे. बीओबी मास्टरस्ट्रोक बचत खातेधारकांना प्रायोरिटी बँकिंग/संपत्ती व्यवस्थापन सेवा, उच्च पातळीचे कॅश विड्रॉवल लिमिट्स आणि खास वैशिष्ट्यांचा लाभ घेता येणार आहे. ग्राहकांना खात्यामध्ये तिमाही सरासरी १० लाख रुपयांचा बॅलन्स राखावा लागणार आहे.
या भागिदारीविषयी आपले विचार व्यक्त करत श्री. सचिन तेंडुलकर म्हणाले, ‘बँक ऑफ बरोडासारख्या काळाबरोबर बदलणाऱ्या आणि सुसंगत राहाणाऱ्या संस्थेबरोबर भागिदारी करताना आनंद होत आहे. शतकभरापूर्वी छोटी सुरुवत करणाऱ्या बँक ऑफ बरोडाचा आज वटवृक्ष झाला आहे. बँक ऑफ बरोडा ही आघाडीची आणि गुणवत्ता, सचोटी व नाविन्यावर उभारलेली बँकिंग संस्था झाली आहे. ही मूल्ये माझ्या मूल्यांशीही सुसंगत आहेत आणि कोणत्याही प्रयत्नाला यश मिळवून देण्यासाठी आवश्यक आहेत, असे मला वाटते. बँक ऑफ बरोडासह अर्थपूर्ण नाते प्रस्थापित करण्यासाठी मी उत्सुक आहे.’
‘या देशातील प्रत्येक नागरिक बँक ऑफ बरोडाची पसंतीची बँकिंग भागीदार म्हणून निवड करत मास्टरस्ट्रोक’ खेळणार आहे,’ असे श्री. चंद म्हणाले.