मुबंई, दि. 16 : भारत निवडणूक आयोगाने दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील एकूण 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी एका टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. यासाठी यंत्रणा सज्ज असून मतदारांनी सक्रिय सहभाग घेत मतदानाचा टक्का वाढवावा, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस.चोक्कलिंगम यांनी येथे केले.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या कार्यक्रमा संदर्भात मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत श्री.चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी विजय राठोड उपस्थित होते.
अजूनही ज्यांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवलेले नाही त्यांना दि. 19 ऑक्टोबरपर्यंत नाव नोंदणी करण्याची संधी अद्याप उपलब्ध असून ऑफलाईन तसेच ऑनलाईन दोन्ही पद्धतीने मतदार आपले नाव मतदार यादीत नोंदवू शकता. निरंतर मतदार नोंदणीचा कार्यक्रम अद्याप सुरु आहे. त्यामुळे ज्या पात्र नागरिकांची अद्यापपर्यंत मतदार नोंदणी झालेली नाही, अशा नागरिकांकडून उमेदवारांचे नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अंतिम दिनांकाच्या 10 दिवस अगोदरपर्यंत म्हणजेच दि. 19 ऑक्टोबर 2024 पर्यंत प्राप्त झालेले अर्ज क्र. 6 मतदार यादीमध्ये नोंद घेण्यासाठी विचारात घेण्यात येतील. तरी या संधीचा लाभ घेऊन सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करत मतदानाचा आपला हक्क आर्वजून बजावावा, असे आवाहन श्री.चोक्कलिंगम यांनी केले.
निवडणूक कार्यक्रमाची रुपरेषा
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 ची अधिसूचना मंगळवार दि. 22 ऑक्टोबर 2024 रोजी राजपत्रात निर्गमित करण्यात येईल. तर नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत मंगळवार दिनांक 29 ऑक्टोबर 2024 रोजी पर्यंत आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी बुधवार दि. 30 ऑक्टोबर 2024 रोजी करण्यात येईल. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत सोमवार दि. 4 नोव्हेंबर 2024 रोजी पर्यंत आहे. बुधवार दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान घेण्यात येणार असून शनिवार दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी करण्यात येईल. सोमवार दि. 25 नोव्हेंबर 2024 रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल. त्याचप्रमाणे राज्यातील लोकसभेच्या 16 – नांदेड या एका लोकसभा मतदारसंघात सुद्धा पोटनिवडणूक घेण्यात येणार असल्याची माहिती श्री. चोक्कलिंगम यांनी यावेळी दिली.
एकूण 9 कोटी 63 लाख 69 हजार 410 मतदार
राज्यात दि. १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पुरुष मतदारांची संख्या ४ कोटी ९७ लाख ४० हजार ३०२ इतकी असून महिला मतदारांची संख्या ४ कोटी ६६ लाख २३ हजार ७७ इतकी तर तृतीय पंथी मतदारांची संख्या ६ हजार ३१ इतकी आहे. आतापर्यंत एकूण ९ कोटी ६३ लाख ६९ हजार ४१० मतदारांची नोंदणी झाली असून यामध्ये सन २०११ च्या जनगणनेनुसार १००० पुरुषांमागे ९२९ महिला (Gender Ratio) असे प्रमाण आहे. सन २०१९ मध्ये मतदार यादीतील महिलांचे प्रमाण 1 हजार पुरुषांमागे 925 इतके होते. यामध्ये वाढ होण्याच्यादृष्टीने महिलांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिम राबविण्यात आल्याने 2024 मध्ये या प्रमाणात 936 अशी लक्षणीय सुधारणा झाली आहे.
सध्याच्या मतदार यादीत १८-१९ वर्षे वयोगटामधील नव मतदारांची संख्या 20 लाख 93 हजार 206 एवढी आहे. याशिवाय 1 लाख 16 हजार 355 इतक्या सेनादलातील (Service Voters) मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. अद्ययावत मतदार यादीमध्ये 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या 12 लाख 43 हजार 192 इतकी आहे. यापैकी इच्छुक मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे गृह मतदानाची सुविधा उपलब्ध होऊ शकेल. मतदार यादीतील 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांपैकी 47 हजार 716 इतके मतदार 100 वर्षावरील आहेत.
सन 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीसाठी असलेले मतदार व सद्यस्थितीत अद्ययावत मतदार यादीप्रमाणे असलेले मतदार यांचा तुलनात्मक तक्ता खालीलप्रमाणे आहे:-
अ.क्र. | तपशील | सन 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीचे मतदार | दि.30 ऑगस्ट, 2024रोजी प्रसिध्द झालेल्या अंतिम मतदार यादीतीलमतदार | दि.15.10.2024 रोजी अद्यावत मतदारांची संख्या |
1 | पुरुष | 4,67,37,841 | 4,93,33,996 | 4,97,40,302 |
2 | महिला | 4,27,05,777 | 4,60,34,362 | 4,66,23,077 |
3 | तृतीयपंथी | 2,593 | 5,944 | 6,031 |
एकूण | 8,94,46,211 | 9,53,74,302 | 9,63,69,410 |
मतदान केंद्रात वाढ
सन 2019 च्या तुलनेमध्ये सन 2024 मध्ये राज्यातील मतदान केंद्रांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे.2019मध्ये 96 हजार 653 असलेली मतदान केंद्रांची संख्या, 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी 1 लाख 186 आहे. यामध्ये शहरी मतदान केंद्र 42 हजार 604 तर ग्रामीण मतदान केंद्र 57 हजार 582 आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक मतदान केंद्रासाठी 1 हजार 500 इतकी कमाल मतदार संख्या निर्धारित करण्यात आली आहे. तसेच शहरी भागातील मतदारांची अनास्था विचारात घेऊन शहरी भागातील मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे, यासाठी राज्यामध्ये पुणे, मुंबई, ठाणे, इ. शहरांमध्ये अतिउंच इमारती/सहकारी गृहनिर्माण संस्थांची संकुले यामध्ये एकूण 1 हजार 181 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. तसेच झोपडपट्टी भागात 210 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.
आयोगाच्या सूचनेनुसार प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, विद्युत पुरवठा, प्रकाश योजना, दिव्यांगांसाठी रॅम्पची व्यवस्था, व्हील चेअर वरील दिव्यांगांसाठी योग्य रुंदीचा दरवाजा व फर्निचर इत्यादी किमान सुविधा, प्रसाधन सुविधा, इ.पुरविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील सर्व मतदान केंद्र तळमजल्यावर ठेवण्यात आलेली आहेत, फक्त मुंबई प्रादेशिक विभागामध्ये उद्वाहन असेल तर वरच्या मजल्यावर मतदान केंद्र ठेवण्यात आलेले आहे.
मतदानाची टक्केवारी
सन 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या मतांची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे.
विधानसभा / लोकसभा निवडणूक | पुरूष मतदान (%) | महिला मतदान (%) | तृतीयपंथी मतदान (%) | एकूण (%) |
विधानसभा सन 2014 | 64.33 | 61.69 | 37 | 63.08 |
विधानसभा सन 2019 | 62.77 | 59.26 | 25.48 | 61.1 |
लोकसभा सन 2024 | 63.45 | 59.04 | 25.35 | 61.33 |
यंत्रणेची सज्जता
महाराष्ट्रामध्ये सर्व विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम-व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात एकूण 2 लाख 26 हजार 624 मतदान यंत्र, एकूण 1 लाख 26 हजार 911 कंट्रोल युनिट आणि एकूण 1 लाख 37 हजार 118 व्हीव्हीपॅट यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे. या सर्व यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. निवडणूक मतदान यंत्रांच्या संदर्भात मतदारांमध्ये जागृती आणि विश्वासार्हता निर्माण व्हावी या हेतूने मोठ्या प्रमाणात जनजागृती कार्यक्रम दि. 10 सप्टेंबर 2024 ते दि. 9 ऑक्टोबर 2024 या कालावधीत राबविण्यात आला. सर्व जिल्ह्यांमध्ये गाव पातळीवर मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून प्रत्यक्ष मतदान यंत्रांवर कसे मतदान करता येते तसेच ही प्रक्रिया कशी सुरक्षित आहे याची जनतेला माहिती देण्यात आली.
प्रत्यक्ष निवडणुकीच्या दृष्टीने लागणारी साधनसामुग्री आणि मतदान केंद्रावरील सोयीसुविधांकरिता योग्य ती कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. तरी निवडणुकीसंदर्भात निवडणूक यंत्रणेस सर्व प्रकारचे सहकार्य करावे. तसेच सर्व मतदारांनी निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष भाग घेऊन मतदान करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
आदर्श आचारसंहिता
भारत निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असल्यामुळे संपूर्ण राज्यात कालपासून तात्काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. ही आचार संहिता विधानसभा नविन सभागृह स्थापन होण्याची घटनात्मक अधिसूचना प्रसिद्ध होईपर्यंत लागू राहिल. त्यामुळे या कालावधीत स्वेच्छाधीन निधीतून अनुदानाचे वाटप, मंत्र्यांचे दौरे व शासकीय वाहनांचा वापर, एकत्रित निधीतून शासकीय जाहिरात प्रसिध्द करणे, नवीन कामांची किंवा नवीन योजनांची घोषणा करणे, शासकीय सार्वजनिक/खासगी संपत्तीचे विद्रुपीकरण इत्यादी बाबींवर निर्बंध लागू झाले आहेत.
आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत निवडणूक खर्चावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. याकरिता राज्यस्तरावर आणि जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उमेदवाराने नामनिर्देशन पत्र भरल्यापासून त्याच्या निवडणूक खर्चाची गणना सुरु करण्यात येईल. मात्र, नामनिर्देशन भरण्यापूर्वी निवडणूक प्रचारासाठीचे साहित्य खरेदी केलेले असल्यास व त्याचा वापर नामनिर्देशनानंतर केला गेल्यास त्या खर्चाचाही समावेश निवडणूक खर्चामध्ये करता येईल. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीकरिता प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा रु.40 लाख इतकी आहे.
राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती
राजकीय पक्षांच्या व उमेदवारांच्या जाहिराती प्रमाणिकरण करण्यासाठी राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती (Media Certification and Monitoring Committee)