रितेश देशमुख एंटरटेनर ऑफ दी इयर, अशोक सराफ यांचा मराठी सिनेमा लीजंड म्हणून गौरव; गश्मीर महाजनी, प्राजक्ता माळी आणि ‘पाणी’ यांनाही मोठे सन्मान
मुंबई : १ मार्च 2025 : एनडीटीव्ही मराठी एंटरटेन्मेंट अॅवॉर्ड्स 2025च्या पहिल्या पर्वाची सांगता अत्यंत दिमाखात झाली. मराठी चित्रपट, टेलिव्हिजन आणि ओटीटी अशा सर्व माध्यमांमधली दिग्गज, द्रष्टी आणि नव्या वाटा धुंडाळणारी व्यक्तिमत्त्वं या झगमगत्या सोहळ्यात सहभागी झाली होती. मराठी मनोरंजन उद्योगाच्या भविष्याला आकार देणारी प्रतिभा आणि सर्जनशीलता यांना मानवंदना देणारा हा मराठी मनोरंजन क्षेत्रातला अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार सोहळा ठरला. एनडीटीव्ही मराठीचा हा पहिलाच पुरस्कार सोहळा एकदम भव्यदिव्य आणि दिमाखदार होता. मुंबईतल्या ताज लँड्स एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेला हा सोहळा अगदी खास असल्याची, तसंच हा पुरस्कार आपल्यासाठी विशेष असल्याची भावना सर्वच पुरस्कारविजेत्यांनी व्यक्त केली. या वैशिष्ट्यपूर्ण सोहळ्याची चर्चा संपूर्ण मराठी मनोरंजनविश्वात होत आहे.
या पुरस्कार सोहळ्याने मनोरंजन क्षेत्रातली दिग्गज व्यक्तिमत्त्वं, उदयोन्मुख कलावंत आणि कंटेट क्रिएटर्स (आशयनिर्माते) अशा सर्वांनाच मराठी मनोरंजन क्षेत्राचं क्षितिज विस्तारण्यातलं त्यांचं योगदान लक्षात घेऊन एकत्र आणलं. नामवंत ज्युरींच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या कस पाहणाऱ्या निवडप्रक्रियेतून फिल्म, टेलिव्हिजन आणि डिजिटल कंटेंट अशा सर्व माध्यमांतल्या विविध श्रेणींमधून पुरस्कारविजेत्यांची निवड करण्यात आली. कथनाच्या सर्व प्रकारच्या माध्यमांमधल्या प्रतिभेची दखल घेतली जावी, असा उद्देश त्यामागे होता.




मराठी मनोरंजन क्षेत्रातल्या सर्वोत्तमतेची दखल एनडीटीव्ही मराठी एंटरटेन्मेंट अॅवॉर्ड्स 2025च्या माध्यमातून घेण्यात आली. बेस्ट फिल्म अॅवॉर्ड ‘पाणी’ या चित्रपटाला मिळाला. आदिनाथ कोठारे यांना त्यांची अद्वितीय कथनशैली आणि दृष्टिकोनाचा गौरव करण्यासाठी बेस्ट डिरेक्टर अॅवॉर्ड देण्यात आला. पाणी या चित्रपटाला एडिटिंग आणि बेस्ट स्टोरी हे पुरस्कारही मिळाले. त्याविषयी भावना व्यक्त करताना आदिनाथ कोठारे म्हणाले, ‘पाणी हा माझ्यासाठी फार महत्त्वाचा चित्रपट आहे. इतक्या मोठ्या पातळीवर त्याला एवढं प्रेम आणि सन्मान दिला गेला आहे, याचा मला खरंच खूप आनंद होतो आहे.’ त्यांनी आपली पूर्ण टीम आणि निर्मात्यांचे आभार मानले.
एनडीटीव्ही मराठीच्या लाँचिंगवेळी चॅनेलचा चेहरा असलेले रितेश देशमुख ‘एंटरटेनर ऑफ दी इयर 2025’ ठरले. या अविस्मरणीय क्षणी आपल्या भावना व्यक्त करताना रितेश देशमुख म्हणाले, ‘एनडीटीव्ही मराठी एंटरटेन्मेंट अॅवॉर्ड्स हे आमच्यासारख्या कलाकारांसाठी खूप मोठं प्रोत्साहन आहे. आणखी चांगलं काम करण्याची ऊर्जा यातून आम्हाला मिळते आहे. त्याबद्दल एनडीटीव्ही मराठीचे आभार!’
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी लीजंडरी मराठी स्टार अॅवॉर्ड स्वीकारला, तेव्हा सर्वांनी उभं राहून त्यांना मानवंदना दिली, हा या सोहळ्याचा भावनिक क्षण होता. या वेळी ते म्हणाले, ‘मी स्वतःला फार भाग्यवान समजतो, की एनडीटीव्ही मराठीच्या पहिल्याच पुरस्कार सोहळ्यात मला नावाजलं गेलं आहे. मला आजवर खूप पुरस्कार मिळाले आहेत; पण हा पुरस्कार माझ्यासाठी खरंच खास आहे. कारण हा या नव्या वाहिनीचा पहिलावहिला पुरस्कार आहे. त्यात माझं नाव आहे, ही खरोखर अविस्मरणीय गोष्ट आहे.’
अभिनयाच्या श्रेणीत फुलवंती सिनेमाने दोन पुरस्कार पटकावले. अनुक्रमे गश्मीर महाजनी आणि प्राजक्ता माळी यांनी प्रेक्षकांना मोहवून टाकणारी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बेस्ट अॅक्टर आणि बेस्ट अॅक्ट्रेस इन ए लीडिंग रोल या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं.
या संपूर्ण सोहळ्यात संगीताच्या जादूनेही राज्य केलं होतं. संकेत साने (घरत गणपती) यांना बेस्ट म्युझिक अल्बमसाठी गौरवण्यात आलं. सचिन पिळगावकर आणि आदर्श शिंदे (डम डम डम डम डमरू वाजे – नवरा माझा नवसाचा 2) आणि वैशाली माडे (मदनमंजिरी – फुलवंती) यांना बेस्ट प्लेबॅक सिंगर्स (मेल अँड फीमेल) हे पुरस्कार देण्यात आले. पार्श्वगायनासाठीचा आपला पहिलाच पुरस्कार स्वीकारताना सचिन पिळगावकर म्हणाले, ‘गेली कित्येक वर्षं मी गातो आहे; पण गायक म्हणून माझ्या कारकीर्दीतलं हे पहिलं पारितोषिक आहे.’ पुढे ते असंही म्हणाले, की ‘हे गाणं मी एकट्याने गायलेलं नाही, तर आदर्श शिंदेने हे माझ्याकडून गाऊन घेतलं आहे!’
टीव्ही आणि डिजिटल प्रकारात बोलायचं झालं, तर ‘लंपन’ला (सोनी लिव्ह) बेस्ट सीरिज अॅवॉर्ड मिळाला. ‘मानवत मर्डर्स’चे कलाकार मकरंद अनासपुरे आणि सोनाली कुलकर्णी यांना त्यांच्या खिळवून टाकणाऱ्या कामगिरीसाठी बेस्ट अॅक्टर अँड अॅक्ट्रेस इन ए सीरिज हे पुरस्कार मिळाले.
मुख्य प्रवाहातल्या यशाच्या पलीकडे जाऊन कलात्मक प्रतिभेचा गौरव करणाऱ्या क्रिटिक्स चॉइस अॅवॉर्ड्समुळे या सोहळ्याची शोभा अधिक वाढली. बेस्ट फिल्म (क्रिटिक्स) अॅवॉर्डवर धर्मवीर 2 या फिल्मने नाव कोरलं. तसंच, जबरदस्त कामगिरीसाठी प्रसाद ओक (धर्मवीर 2) आणि राजश्री देशपांडे (सत्यशोधक) यांना बेस्ट अॅक्टर (क्रिटिक्स) आणि बेस्ट अॅक्ट्रेस (क्रिटिक्स) या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं.
एनडीटीव्ही मराठी एंटरटेन्मेंट अॅवॉर्ड्सचा प्रारंभ अत्यंत नेत्रदीपक असा झाला असून, मराठी चित्रपट, टेलिव्हिजन आणि ओटीटी यांमधल्या सर्वोत्कृष्टतेची दखल घेण्यात एक नवा मानदंड त्यांनी प्रस्थापित केला आहे. प्रतिभा, कथनशैली आणि सर्जनशीलतेचा हा भव्य सोहळा आगामी काळात एक महत्त्वाचं व्यासपीठ ठरेल आणि मराठी मनोरंजन क्षेत्र मोठ्या व्यासपीठावर झळकत राहील याची काळजी घेणारा ठरेल, याची साक्ष देणारा होता.
आठ मार्च २०२५ (शनिवारी) रोजी एनडीटीव्ही मराठी चॅनेलवर या सोहळ्याचं प्रसारण पाहता येणार आहे. मराठी मनोरंजन विश्वातल्या या मोठ्या सोहळ्याची जादू तेव्हा नक्की अनुभवायला विसरू नका.