फ्रान्समध्ये शिकण्यासाठी फ्रेंच येणे आवश्यक नाही; अनेक अभ्यासक्रम इंग्रजीत उपलब्ध असल्याची माहिती

News Service

मुंबई, दि. २१ : आता फ्रान्स भारताशी शैक्षणिक सहकार्य वाढविण्याबद्दल उत्सुक असून आज फ्रान्स येथील विद्यापीठांमध्ये किमान १७०० अभ्यासक्रम इंग्रजीतून राबविले जातात. फ्रान्समध्ये शिकण्यासाठी फ्रेंच भाषा येणे आवश्यक नाही, असे प्रतिपादन फ्रान्सचे मुंबईतील वाणिज्यदूत जॉन मार्क सेर शार्ले यांनी आज येथे केले.

वाणिज्यदूत सेरे शार्ले यांनी सोमवारी (दि. २१) राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.

आयआयटी मुंबई व फ्रान्सचे इकोल पॉलिटेक्निक यांच्यात शैक्षणिक सहकार्य व विद्यार्थी परस्पर आदानप्रदान याबाबत नुकताच करार झाला असल्याचे फ्रान्सच्या वाणिज्यदूतांनी यावेळी राज्यपालांना सांगितले.

फ्रान्सच्या अंदाजे ५०० कंपन्या मुंबई, पुणे, नागपूर व नाशिक येथे कार्यरत असून त्याठिकाणी रोजगार निर्मिती तसेच कौशल्य वर्धन करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

फ्रान्स भारताशी वैज्ञानिक नवोन्मेष (इनोव्हेशन) व संशोधन क्षेत्रात काम करण्यास उत्सुक असल्याचे सेर शार्ले यांनी सांगितले.

२०२६ हे वर्ष फ्रान्स – भारत नवोन्मेष वर्ष साजरे केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. अलियान्स फ्रान्सेस  ही संस्था मुंबई पुणे यांसह इतरत्र फ्रेंच भाषा अध्यापनाचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

फ्रान्समध्ये मोठ्या संख्येने भारतीय राहत असून हा समुदाय विविध क्षेत्रात योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले.

फ्रान्स – भारत व्यापार संबंध दृढ होण्यासाठी भारत व युरोपिअन महासंघामध्ये  मुक्त व्यापार करार होणे आवश्यक आहे असे राज्यपाल राधाकृष्णन यांनी यावेळी सांगितले. भारत – फ्रान्स या देशांमध्ये संरक्षण क्षेत्रापासून अनेक क्षेत्रात उत्तम सहकार्य असून ऊर्जेबाबत स्वयंपूर्ण असणाऱ्या फ्रान्सने भारताला स्वच्छ ऊर्जा निर्मितीमध्ये मदत करावी अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

भारत व फ्रान्स दोन्ही लोकशाही राष्ट्रे असून विद्यार्थी व सांस्कृतिक आदानप्रदानामुळे उभय देशांमधील लोकांमध्ये घनिष्ठ संबंध प्रस्थापित होतील असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button