स्वदेश फाउंडेशनने यू मुम्बा संघासोबत भागीदारी करताना मैदानी कामगिरीला सामाजिक परिवर्तनात रूपांतरित केले आहे—महाराष्ट्रातील ग्रामीण घरांमध्ये स्वच्छ व अक्षय ऊर्जेचा प्रकाश देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
प्रो कबड्डी लीगच्या ११व्या हंगामासाठी अधिकृत सामाजिक भागीदार असलेल्या स्वदेश फाउंडेशनसोबतच्या या भागीदारीचा एक भाग म्हणून, यू मुम्बा संघाने ग्रामीण घरांमध्ये सौरऊर्जा पोहोचवण्याचे वचन दिले.
हंगामात दर सुपर टॅकलसाठी १५ आणि दर सुपर रेडसाठी १० ग्रामीण घरांमध्ये सौर लाइटिंग किट्स बसवण्यात आल्या. हंगामात एकूण ८ सुपर टॅकल्स आणि ४ सुपर रेड्स झाल्यामुळे, एकूण १६० ग्रामीण घरांमध्ये स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेचा प्रकाश पोहोचवण्यात आला.

या सामाजिक बांधिलकीचा सन्मान करण्यासाठी, यू मुम्बा संघाचा प्रमुख खेळाडू अजित चौहान याने नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील बडगी गावाला भेट दिली. त्याने सौर प्रकाशयंत्रणेचा स्विच ऑन करत हा उपक्रम प्रतिकात्मक रूपात सुरू केला. त्यानंतर अजितने स्वदेश फाउंडेशनच्या “ड्रीम व्हिलेज” गाईधोंडला भेट दिली, जिथे स्थानिक मुलांनी मोठ्या उत्साहाने त्याचे स्वागत केले. गावातील मुलांनी आनंदात जल्लोष केला आणि आपल्या कबड्डी हिरोसोबत फोटो काढले—त्यांच्यासाठी सौर प्रकाश आणि अजितची भेट दोन्ही पर्वणी ठरली.
यू मुम्बाचे सीईओ सुहैल चांधोक म्हणाले: “यू मुम्बासाठी मैदानाबाहेर निर्माण होणारा प्रभाव तितकाच महत्त्वाचा आहे जितका मैदानावरील कामगिरी. स्वदेश फाउंडेशनसोबतच्या भागीदारीतून, हंगामातील प्रत्येक सुपर रेड आणि सुपर टॅकल केवळ आकडे नव्हते—ते एखाद्या जीवनात प्रकाश टाकणारे पाऊल होते. १६० ग्रामीण घरांमध्ये सौर ऊर्जा पोहोचवण्यात आम्हाला अभिमान वाटतो, आणि ही तर फक्त सुरुवात आहे—खेळाच्या पलीकडेही परिवर्तन शक्य आहे.
स्वदेश फाउंडेशनचे सीईओ श्री. मंगेश वांगे म्हणाले यू मुम्बासोबतची ही भागीदारी खेळ आणि सामाजिक परिवर्तन या दोन जगांमधील सुंदर सेतू आहे. प्रत्येक सुपर टॅकल आणि सुपर रेडने केवळ चाहत्यांना उत्साही केले नाही, तर ज्यांना सर्वाधिक गरज आहे अशा ग्रामीण घरांमध्ये स्वच्छ, अक्षय प्रकाश पोहोचवला. मैदावर मनापासून खेळणाऱ्या आणि मैदानाबाहेर सामाजिक उद्देशासाठी उभ्या असलेल्या संघासोबत काम करत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. बडगी गावातील एका घरात यू मुम्बाचा स्टार खेळाडू अजित चौहानने सौर दिवा लावलेला क्षण संपूर्ण गावासाठी विशेष ठरला—आणि विशेषतः तरुणांना प्रेरणा देणारा ठरेल.
ही यू मुम्बा आणि स्वदेश फाउंडेशन यांच्यातील सलग दुसऱ्या वर्षी होणारी सामाजिक परिणामांवर लक्ष केंद्रित करणारी भागीदारी आहे. २०२३ मध्ये या भागीदारीतून ‘न्यू ऑर्चर्ड प्रोग्रॅम’ अंतर्गत रायगड जिल्ह्यात ४,३०० फळझाडांची लागवड करण्यात आली होती, ज्याचा उद्देश हिरवळ वाढवणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा होता