तुम्ही तुमचा कोलेस्ट्रोल तपासताय का? तज्ज्ञांच्या मते याचे प्रमाण जपणे रक्तदाब आणि साखरेच्या पातळीइतकेच महत्त्वाचे

News Service

भारतामध्ये डायबेटिस किंवा उच्च रक्तदाबासारख्या आरोग्यविषयक चिंतांकडे लक्ष देण्याच्या भरात बरेचदा कोलेस्ट्रोलच्या वाढणाऱ्या पातळीकडे दुर्लक्ष केले जाते. लिपिड प्रोफाइलची चाचणी म्हणजे हृदयाचे आरोग्य सांभाळण्याच्या प्रयत्नांची आधारशीला आहे, ज्यातून एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकसारख्या स्थिती उद्भवण्याचा कितपत धोका आहे याविषयीची अमूल्य अशी सखोल माहिती हाती येते. निदानाचे हे अत्यावश्यक साधन रक्तातील लो-डेन्सिटी लायपोप्रोटीन कोलेस्ट्रोल (LDLC), हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन कोलेस्ट्रोल (HDLC), एकूण कोलेस्ट्रोल आणि ट्रायग्लिसराइड्ससारख्या अनेक घटकांची पातळी मोजते. या मोजणीमुळे एखाद्या व्यक्तीमध्ये लिपिड्स म्हणजे रक्तातील चरबीच्या असाधारण प्रमाणात वाढलेल्या पातळीमुळे उद्भवणाऱ्या हार्ट अटॅक आणि स्ट्रोकसारख्या कार्डिओव्हॅस्क्युलर स्थिती विकसित होण्याच्या शक्यतेला सर्व बाजूंनी समजून घेणे शक्य होते.

लिपिड प्रोफाइल चाचण्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत, कारण आपण ज्याला ‘बॅड कोलेस्ट्रोल’ म्हणतो त्या LDLC ची पातळी वाढल्याची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत, म्हणूनच तर त्याला ‘सायलेन्ट किलर’ हे नाव मिळाले आहे. कालांतराने धमन्यांमध्ये त्याचा थर साचत जातो आणि त्यातून अडथळे अर्थात ब्लॉकेजेस तयार होतात व त्यामुळे हृदयाला हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकसारखे मोठे धोके निर्माण होतात. म्हणूनच या समस्येचे निदान लवकरात लवकर झाल्यास डॉक्टर्स काही उपचारात्मक हस्तक्षेपांची शिफारस करू शकतात, ज्यातून अशा गंभीर परिणामांना टाळता येऊ शकते.

लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या जून २०२३च्या एका अभ्यासातून हाती आलेल्या निष्कर्षांनुसार ८१ टक्‍के भारतीयांना हाई कोलेस्ट्रॉल त्रास आहे. धोक्याची सूचना देणाऱ्या या आकडेवारीतून LDLC वरील देखरेखीला सार्वजनिक आरोग्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमध्ये सर्वात पुढे ठेवण्याची तातडीची गरज व्यक्त होते.

फोर्टिस हॉस्पिटल, मुंबई येथील कार्डिओलॉजिस्ट डॉ. झाकिया खान सांगतात, “LDLC ची पातळी अनेक वर्षे मूकपणे व बहुतेकदा कोणत्याही लक्षणांविना वाढत असते ही गोष्ट अनेक रुग्णांच्या लक्षात येत नाही व ती लक्षात येईतो खूप उशीर झालेला असतो. लिपिड प्रोफाइल नियमितपणे तपासणे महत्त्वाचे आहे, कारण या समस्येचे निदान लवकर झाले तर गंभीर गुंतागूंती उद्भवण्याआधीच हस्तक्षेप करणे शक्य होते. माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी २५ ते ३० टक्‍के रुग्णांना गैरसमजूतीमुळे किंवा जागरुकतेच्या अभावी कोलेस्ट्रोल व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष करताना पाहिले आहे. लोकांनी ही चाचणी करून घ्यावी, आपल्यासाठी LDCL ची इप्सित पातळी किती असावी हे जाणून घ्यावे आणि उपचारांचे शिस्तीने पालन करावे अशी माझी कळकळीची विनंती आहे. त्यांनी आपल्या फिजिशियनची नियमित भेट घेतली पाहिजे व हा आजार बरा करण्यासाठी आपणहून पावले उचलली पाहिजेत.”

LDLC च्या व्यवस्थापनासाठी वैयक्तिकृत दृष्टिकोन आवश्यक ठरतो, कारण इप्सित पातळी प्रत्येकासाठी समान नसते तर प्रत्येक व्यक्तीला असलेल्या आरोग्याच्या जोखमींनुसार ती बदलते. लिपिड चाचण्यांमुळे व्यक्तीची इप्सित पातळी समजू शकते आणि त्याच्या/तिच्यासाठी योग्य उपचारपद्धती कोणती हे ठरवता येते. कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया (CSI) ने रुग्णांचे जोखीम गटांनुसार वर्गीकरण करण्यासाठी तपशीलवार मार्गदर्शक सूचना आखून दिल्या आहेत. कमी धोका असलेल्या, फारशा गंभीर आरोग्य समस्या नसलेल्या व्यक्तींसाठी LDLC ची इप्सित पातळी १३० mg/dL च्या खाली असली पाहिजे. अनेक प्रकारच्या धोकादायक समस्या असलेल्या किंवा दीर्घकाळापासून मधुमेहाचे रुग्ण असलेल्या व्यक्तींसह उच्च जोखीम गटात येणाऱ्या व्यक्तींसाठी LDLC ची पातळी ७० mg/dL च्या खाली असली पाहिजे. ज्यांना कार्डिओव्हॅस्क्युलर आजार असल्याचे स्पष्ट झाले आहे अशा अत्यंत धोकादायक गटात मोडणाऱ्या रुग्णांसाठी ही पातळी ५५ mg/dL च्या खाली असणे आवश्यक आहे, तर कुटुंबदत्त हायपरकोलेस्ट्रोलेमियासारख्या त्याहूनही खूप जास्त धोका असलेल्या व्यक्तींनी ही पातळी ४० mg/dL च्या खाली राखण्याचे लक्ष्य ठेवणे गरजेचे आहे. म्हणूनच LDLC वर उपचार करताना वैयक्तिकृत देखभाल गरजेची असते व डॉक्टरांशी नियमित सल्लामसलत तसेच सांगितलेल्या ट्रीटमेंट प्लानचे काटेकोरपणे पालन करणे अत्यावश्यक ठरते.

हेच मुद्दे कोलेस्ट्रोल चाचणी किती वेळा करावी या प्रश्नालाही लागू होतात. सर्वसाधारण लोकसंख्येसाठी दर ४-६ वर्षांनी लिपिड प्रोफाइलचे मूल्यमापन करून घेण्याचा सल्ला दिला जातो. अशी चाचणी वयाच्या २०व्या वर्षापासून सुरू करावी. मात्र धोका वाढविणाऱ्या समस्या असलेल्या व्यक्तींनी अधिक वेळी देखरेख ठेवणे गरजेचे ठरते. मध्यम धोका असलेल्या व्यक्तींनी दर १-३ वर्षांत चाचणी करून घ्यावी तर मधुमेह असलेल्या किंवा कार्डिओव्हॅस्क्युलर आजार प्रस्थापित झालेल्या व्यक्तींसारख्या उच्च धोका असलेल्या व्यक्तींनी वार्षिक तपासणी करून घ्यावी. चरबी कमी करण्यासाठी उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठीही या पातळीवर नियमित देखरेख ठेवणे अत्यावश्यक ठरते कारण त्यातून उपचारांच्या परिणामकारकतेचे मूल्यमापन करण्यास मदत होते आणि आवश्यक त्या बदलांसाठी मार्गदर्शन मिळते.

हृदयाचे आरोग्य जपणारी आहारपद्धती स्वीकारणे, नियमितपणे व्यायाम करणे आणि पुरेशी झोप मिळेल याची खबरदारी घेणे यांसारख्या जीवनशैलीतील सुधारणाही डिसलिपिडेमियाच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने अनिवार्य आहेत. मात्र या उपाययोजनांना औषधोपचारांना पर्याय मानता कामा नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button