नवी मुंबई – ५ जून २०२५ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हेन्केल इंडियाने नवी मुंबई महानगरपालिका (एनएमएमसी) सोबत भागीदारी करून नवी मुंबईतील टीएस चाणक्य जवळील खारफुटीच्या पट्ट्यात स्वच्छता मोहीम आयोजित केली, ज्यामुळे पर्यावरणीय देखभालीप्रती असलेली त्यांची कटिबद्धता आणखी दृढ झाली. या वर्षीच्या ‘आपली जमीन. आपले भविष्य. आपण आहोत #जनरेशनरिस्टोरेशन’ थीमशी सुसंगत असलेल्या या उपक्रमामध्ये शहरातील सर्वात महत्त्वाच्या आणि जैवविविध किनारी परिसंस्थेमधील प्लास्टिक प्रदूषणाचे निराकरण करण्यासाठी हेन्केल कर्मचारी, एनएमएमसी कर्मचारी आणि विविध कॉलेजमधील विद्यार्थ्यांसह जवळपास १०० स्वयंसेवक एकत्रित आले.

”या स्वच्छता मोहिमेमधून हेन्केलची शाश्वतता, नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन आणि समुदाय-केंद्रित कृती यांच्याप्रती दीर्घकालीन कटिबद्धता दिसून येते. नवी मुंबई महानगरपालिकेच्या अविरत पाठिंब्याबद्दल आणि सर्व स्वयंसेवकांच्या उत्साही सहभागाबद्दल आम्ही त्यांचे मन:पूर्वक आभार मानतो, ज्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हा उपक्रम प्रभावी आणि प्रेरणादायी बनला आहे. अर्थपूर्ण, दीर्घकालीन बदल घडवून आणण्यासाठी यांसारख्या सातत्यपूर्ण, स्थानिक कृती आवश्यक आहेत,” असे हेन्केलचे भारतातील कंट्री प्रेसिडेंट एस. सुनिल कुमार म्हणाले.
नवी मुंबईतील खारफुटी वन शहराची नैसर्गिक संजीवनी आणि संरक्षक म्हणून काम करते. ते प्रदूषकांना फिल्टर करतात, कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि वादळ लाटांपासून व पुरापासून अंतर्गत भागांचे संरक्षण करतात. ते फ्लेमिंगो आणि किंगफिशर सारख्या स्थलांतरित पक्ष्यांसाठी जैवविविधतेचे आकर्षण केंद्र देखील आहे, जे या प्रदेशाच्या पर्यावरणीय आरोग्याचे सूचक बनले आहे. प्लास्टिक आणि जैवविघटन न होणारा कचरा या परिसंस्थेसाठी सतत त्रासदायक ठरत आहे. स्वयंसेवकांनी जवळपास ५००० किलो कचरा गोळा करून वेगळा केला, ज्यामुळे किनारपट्टीवरील धूप आणि हवामानाच्या परिणामांपासून पर्यावरणाचे संरक्षण करण्यास मदत झाली.

सहभागींद्वारे विचारांच्या आदान-प्रदानाने मोहिमेची सांगता झाली, ज्यामध्ये अनेक स्वयंसेवकांनी त्यांच्या समुदायांमध्ये पर्यावरणीय उपक्रमांना पाठिंबा देत राहण्याचे वचन दिले. हेन्केल आणि एनएमएमसीचा त्रैमासिक स्वच्छता, जनजागृती कार्यशाळा आणि मार्गदर्शित नेचर वॉक्स आयोजित करण्याचा मनसुबा आहे, ज्यामुळे उत्साह कायम राहील आणि समुदायाचा सहभाग वाढेल. ही स्वच्छता मोहीम हेन्केलच्या नवी मुंबईतील व्यापक पर्यावरणीय प्रयत्नांचा भाग आहे आणि महत्त्वाच्या पर्यावरणीय क्षेत्रांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांसोबत वर्षानुवर्षे केलेल्या सहयोगावर आधारित आहे.