भारतातील विविध कलादालने व नामांकित चित्रकारांचा समावेश
“कलास्पंदन कला महोत्सव – २०२४” हा भव्य कला महोत्सव दि. २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर, २०२४ हया दरम्यान मुंबईत नेहरू सेंटर, २ रा मजला, डिस्कवरी ऑफ इंडिया बिल्डिंग, डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी येथे भरविण्यात आला आहे. हया भव्य कला महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार दि. २९ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेते मुकेश ऋषि, श्री. संजय पाटील (एसीपी, मुंबई) यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी कला आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदर महोत्सवात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ३०० पेक्षा जास्त चित्रकार व शिल्पकार भाग घेणार असून त्यांच्या ३५०० कलाकृतींचा तसेच विविध कलादालनांचा समावेश करण्यात आला आहे.
इंडियन आर्ट प्रमोटरने आयोजित केलेल्या हया कला महोत्सवात अनेक प्रथितयश तसेच समकालीन चित्रकार व शिल्पकार यांच्या तैलरंग, जलरंग, अक्रीलिक, चारकोल, मिक्स मीडियम, ब्रोंझ, धातुशिल्प वास्तववादी आणि निम्न वास्तववादी तसेच अमूर्त शैलीतील कलाकृतींचे सादरीकरण होणार आहे. विद्यमान कलाजगतातील चित्रकारांच्या व शिल्पकारांच्या विविधांगी व वैशिष्ट्यपूर्ण अशा ३५०० च्यावर कलाकृती बघण्याची सुवर्णसंधी सर्व कलाप्रेमी व रसिकांना हया कला मेळाव्यात पहायला मिळणार आहे. सदर महोत्सवात देशभरातील नामांकित कलाकार व चित्रकारांचा समावेश असून त्यांनी साकारलेल्या चित्र, शिल्प, फोटोग्राफी, रेझिन आर्ट, कॅलिग्राफी, मंडला आर्ट, मधुबनी आर्ट, सिरेमिक आर्ट, मोजेक आर्ट, डेकोरेटीव्ह आर्ट, पारंपारिक कला, हस्तकला इत्यादी अनेक कलाकृतीं रसिकांना पाहायला मिळणार आहेत. तसेच २९ नोव्हेंबर ब्लॅक फ्रायडे सवलत सर्व दिवसांसाठी उपलब्ध असून सदर कलाकृती रसिकांना तिन्ही दिवस अगदी स्वस्त दरात विकत घेता येतील. हा कला महोत्सव दि. २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर, २०२४ हया कालावधीत रोज ११ ते ७ हया वेळेत रसिकांना विनामुल्य पाहायला मिळणार आहे.