पुणे येथील सुप्रसिद्ध चित्रकार पंकज झा ह्यांच्या चित्रांचे एकल प्रदर्शन हिरजी जहांगीर कलादालन, महात्मा गांधी मार्ग, काळा घोडा, मुंबई ४००००१ येथे २ डिसेंबर २०२४ पासून सुरु झाले असून ते तेथे सर्वांना ८ डिसेंबर २०२४ पर्यंत रोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ ह्या वेळेत विनामूल्य बघता येईल. ह्या चित्रप्रदर्शनात काळा, पांढरा व स्लेटी ग्रे ह्या रंगसंगतीचा कलात्मक वापर केला आहे व ती चित्रे सर्वांना एक वेगळीच अनुभूती देतात.
पंकज झा ह्यांचे शिक्षण B.F.A. (फाईन आर्टस्) पर्यंत कॉलेज ऑफ आर्ट अँड क्राफ्ट, पाटणा विद्यापीठ येथे झाले. नंतर त्यांनी वेगवेगळ्या कलादालनातून ६ एकल चित्रप्रदर्शनातून आपली कला रसिकांपुढे सादर केली. त्यांच्या चित्रांना नेहमी रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. काहीसे अंतर्मुख, तत्वज्ञ व कवीमनाचा लाभ झालेले चित्रकार पंकज झा ह्यांची मनोवृत्ती शोधक व जीवनातील ज्ञात आणि अज्ञात अनुभूतीचा शोध घेणारी आहे. त्यामुळे त्यांच्या ह्या विचारसरणीचे चित्रमय दर्शन सर्वांना अशा चित्रमाध्यमातून होते.
प्रस्तुत प्रदर्शनात त्यांनी ठेवलेली चित्रे एक्रिलिक रंग वापरून कॅनव्हासवर काढली आहेत व त्यात काळा, पांढरा आणि त्या समन्वयातून निर्माण होणारा स्लेटी ग्रे ह्या रंगसंगतीचा समावेश आहे. त्यांच्या चित्रांमधून कविता, कहाणी व निःशब्द अनुभूती जाणवते. जमीन व आकाश ह्यांना सामावणारे क्षितिज आणि त्यात आढळणाऱ्या अनेक गूढ गोष्टी ह्यांचे त्यांच्या चित्रसंपदेत दर्शन होते. अंधार, गडद काळोख, प्रकाशकिरण, तेजोमयता वगैरेंचा आपल्या संकल्पेतून चित्रांमध्ये समावेश करताना त्यांनी वादळ, तुफान, रात्र, दिवस आणि त्यांच्यातील चमत्कृतींची अनुभूती साकारताना मोती व तत्सम प्रतीकांचा एक कलात्मक वापर केला आहे. काळा, पांढरा व स्लेटी ग्रे ह्या रंगसंगतीचा उपयोग करीत असताना त्यांनी सत, रजस व तमस ह्या शक्तींचा योग्य वापर केला असून त्यातून आपल्या खास वैशिष्ट्यपूर्ण शैलीत अपेक्षित दृष्यपरिणाम कॅनव्हासवर साकारला आहे जो सर्व दर्शकांना मंत्रमुग्ध करतो व त्यांची दाद मिळवतो.
काहीशा निम्न अमूर्त शैलीत साकारलेली ही चित्रे बोलकी व परिणामकारक आहेत आणि त्यांचा प्रभाव रसिकमनावर पडतो. तो त्याला अंतर्मुख करून जीवनाविषयी विचार करण्यास प्रवृत्त करतो. उंच इमारतींच्या वरून अवकाशात झेप घेण्याची संकल्पना ह्या चित्रांतून प्रभावीपणे जाणवते.
अशा ह्या अनोखा चित्रप्रदर्शनास सर्वांचा सकारात्मक प्रतिसाद लाभेल आणि त्यामुळे चित्रकार पंकज झा ह्यांना त्यांच्या पुढील चित्रनिर्मितीसाठी व सादरीकरणासाठी योग्य प्रेरणा मिळेल हे निर्विवाद.
रवींद्र पांडे,
कलासमीक्षक.