स्टार्टअप्सना वेगवान प्रगतीसाठी, अद्ययावत बनण्यासाठी व व्यवसायवृद्धीसाठी सक्षम बनविणाऱ्या BizLabs अॅक्सलरेटर प्रोग्रामचा शुभारंभ
कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्रामच्या माध्यमातून सुमारे १००० स्टार्टअप्सना सक्षम बनविण्याचे लक्ष्य
मुंबई, डिसेंबर २०२४: कोटक महिंद्रा बँक लि. (“KMBL”/ “Kotak”) ने आपल्या CSR प्रयत्नांचा एक भाग म्हणून प्रारंभिक महसूल उभा करण्याच्या टप्प्प्यावर असलेल्या स्टार्टअप्ससाठी BizLabs अॅक्सलरेटर प्रोग्राम हा नवा उपक्रम सुरू केला आहे. स्टार्टअप्सना वाढीच्या मार्गामध्ये येणारी आव्हाने पार करण्यास व प्रभावीपणे व्यवसाय विस्तारण्यास मदत करण्याच्या दृष्टीने या उपक्रमाची रचना करण्यात आली आहे. IIMA व्हेंचर्स, NSRCEL, आणि T-Hub यांसारख्या अव्वल क्रमांकाच्या इन्क्युबेटर्सशी सहयोग साधत कोटक BizLab प्रत्येक व्यवसायाच्या विशिष्ट गरजांनुसार बेतलेले, गतीमान प्रगतीस मदत करणारे उपक्रम पुरवेल, ज्यात मेंटरशिप, बाजारपेठेची उपलब्धता आणि सल्लागारांच्या पाठबळाचा समावेश असेल.
भारतीय स्टार्टअप्सच्या क्षेत्रामध्ये उत्साह भरपूर आहे, मात्र आपली बाजारपेठ विस्तारणे, अधिकाधिक ग्राहक मिळवणे, कामकाजाची व्याप्ती वाढविणे आणि धोरणात्मक भागीदारीच्या संधी शोधणे यांसारख्या लक्षणीय आव्हानांना हे क्षेत्र सामोरे जात आहे. अनेक इन्क्युबेटर प्रोग्राम्स स्टार्टअप्सच्या प्रारंभिक टप्प्यावर (ideation and conception) लक्ष केंद्रित करतात मात्र व्यवसायात वाढ करण्याच्या टप्प्यावर असलेल्या आणि स्पर्धेमधून मार्ग शोधणे, आपल्या उत्पादनाला बाजारपेठेसाठी सक्षम बनविण्याच्या दृष्टीने अधिक नीटनेटके बनविणे, व्यवसाय विस्तारण्यासाठी आणि कामकाजाची व्याप्ती वाढविण्यासाठी निधी उभा करणे अशा आव्हानांना सामोऱ्या जात असलेल्या अर्ली ग्रोथ स्टार्टअप्सवर लक्ष केंद्रित करणाऱ्या प्रोग्राम्सची संख्या अगदी थोडी आहे.
कोटक BizLabs उपक्रम व्यक्तिगत सहाय्य, विषयसूत्रांवर आधारित कार्यशाळा, संबंधित परिसंस्थांची ओळख करून देणे, स्पर्धांतील सहभाग, मेंटरिंग, भागीदारी, व्यवसाय विकास, बीजभांडवलाची हमी आणि प्रात्यक्षिकांसाठीचे डेमो डेज या सुविधा पुरवून हे प्रश्न हाताळतो.
कोटक BizLabs कार्यक्रम अॅग्रिटेक, क्लायमाटेक, फिनटेक, एडटेक, हेल्थकेअर आणि सस्टेनॅबिलिटी यांसारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व निधीउभारणीच्या सुरुवातीच्या टप्प्यावर असलेल्या स्टार्टअप्सना सक्षम बनविण्याचे व हे करताना समाजावर प्रभाव टाकणाऱ्या उत्पादन व सेवांवर मोठ्या प्रमाणात भर देण्याचे लक्ष्य बाळगतो. हा कार्यक्रम व्यावसायिक समुदायांशी असलेल्या आपल्या सर्वव्यापी संपर्काच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचे पाठबळ पुरविण्यास सज्ज आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये सुमारे १००० स्टार्टअप्सना अनमोल अशा नेटवर्किंगच्या संधी पुरवेल, व्हर्च्युअल नॉलेज सेंटर्समध्ये प्रवेश मिळवून देईल व त्यांच्यासाठी हायब्रिड कार्यशाळांची मालिका आयोजित करेल. इतकेच नव्हे, तर उच्च-क्षमतेच्या ५० स्टार्टअप्सना वेगाने प्रगती साधण्यासाठी भरभक्कम पाठबळ दिले जाईल; ज्यामध्ये ३० निवडक स्टार्टअप्सना दिल्या जाणाऱ्या प्रत्येकी रु. १५ लाखांच्या अनुदानाचा समावेश असेल.
कोटक महिंद्रा बँक लि.च्या CSR व ESG विभागाचे सीनिअर एक्झेक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडंट हिमांशू निवसरकर म्हणाले, ”प्रारंभिक टप्प्यावर असलेली स्टार्टअप कंपनी ते एक भरभराटीस आलेला व्यवसाय हा प्रवास आव्हानात्मक असतो. कोटकमध्ये आम्ही हे जाणतो की, स्टार्टअप्सना आपल्या विकासाला गती मिळवून देण्यासाठी केवळ निधीच्या पलीकडे विशेष पाठबळाची, मेंटरशिपची आणि धोरणात्मक भागीदारीची गरज असते. Kotak BizLabs अॅक्सलरेटर प्रोग्राम म्हणजे भारतातील स्वयंरोजगाराचा मार्ग निवडलेल्या गटाच्या उर्मींना खतपाणी देण्याशी कोटक महिंद्रा बँकेने जपलेल्या बांधिलकीचे मूर्त उदाहरण आहे. हा उपक्रम महत्त्वाकांक्षी भारतीयांच्या स्वप्नांना बळ पुरविण्याच्या, नवसंकल्पनांना चालना देण्याच्या आणि स्वयंरोजगारित क्षेत्रासाठी एक भरभक्कम परिसंस्था निर्माण करण्याच्या कोटकच्या ध्येयधोरणांशी मेळ साधणारा आहे. अव्वल क्रमांकाच्या इन्क्युबेटर्सशी सहयोग साधत १००० स्टार्टअप्सपर्यंत पोहोचण्याचे Kotak BizLabs चे लक्ष्य आहे व हा कार्यक्रम उद्योगक्षेत्रातील नेतृत्वाच्या नव्या फळीला पाठबळ पुरविण्यासाठी, भारताच्या नवप्रवर्तनामध्ये आपले योगदान देण्यासाठी, रोजगारनिर्मितीसाठी आणि आर्थिक भरभराटीसाठी आवश्यक संसाधने पुरविणार आहे.”
“संसाधने, मार्गदर्शन व भागीदारी यांच्या योग्य मिसळणीतून उच्च क्षमतेच्या स्टार्टअप्सना खतपाणी पुरविण्यातच नवसंकल्पनांची जोपासना करण्याची व शाश्वत वाढीला चालना देण्याची गुरुकिल्ली दडली आहे, असा NSRCEL मध्ये आमचा विश्वास आहे. द्रष्ट्या उद्योजकांच्या नव्या पिढीला पाठबळ पुरविण्याच्या कामी Kotak BizLabs अॅक्सलरेटर प्रोग्रामशी सहयोग साधण्यास आम्ही अत्यंत उत्सुक आहोत. इन्क्युबेशनच्या क्षेत्रातील आमची अनुभवसिद्धता आणि स्टार्टअप्सना सक्षम बनविण्याप्रती कोटकने जपलेली बांधिलकी यांच्यातील सहयोगातून एक असे वातावरण निर्माण होईल, जिथे कल्पनांना बहरता येईल, व्यवसायांना आपली व्याप्ती वाढविता येईल आणि उद्याचे नेते उदयास येऊ शकतील.” NSRCELचे सीईओ श्री. आनंद श्री गणेश म्हणाले.
IIMA व्हेंचर्सच्या पार्टनर-इनक्युबेशन चिंतन बक्षी म्हणाले, “IIMA व्हेंचर्सने जिथे आधीच आपली पावले भक्कमपणे रोवली आहेत अशा अहमदाबाद, इंदूर आणि जयपूर सारख्या द्वितीय व तृतीय श्रेणी शहरांसारख्या भारताच्या विस्तारत्या स्टार्टअप केंद्रांमधून लक्षणीय उद्योजकीय ऊर्जा आणि प्रतिभा उदयास येताना पाहत आहोत. ही शहरे म्हणजे द्वितीय आणि तृतीय श्रेणी क्षेत्रांतील हे अद्याप वापरात न आणल्या गेलेल्या क्षमतांची मूर्तीमंत उदाहरणे आहेत, जिथे नवे व्यवसाय स्थापन करणाऱ्यांकडून स्थानिक व जागतिक आव्हानांवर मात करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाययोजनांची उभारणी केली जात आहे. Kotak BizLabs अॅक्सलरेटर प्रोग्रामचे या क्षेत्रांमधील प्रारंभिक टप्प्यावर असलेल्या उद्योजकांना संबंधित व लक्ष्यित पाठिंबा पुरविण्याच्या दृष्टीने एक आगळेवेगळे स्थान आहे. महानगरांच्या पलीकडे पाहणारा हा उपक्रम बरेचदा आरेखित संसाधने व मार्गदर्शनाच्या उपलब्धतेचा अभाव असलेल्या स्टार्टअप्ससाठी समावेशकतेला व उपलब्धतेला खतपाणी पुरविते. एकत्रितपणे धाडसी कल्पनांना बळ पुरविण्याचे आणि पुरेशा सेवा न पोहोचलेल्या प्रांतांतील स्टार्टअपसना भरभराट साधण्यास सक्षम बनविण्याचे तसेच नवसंकल्पनांच्या परिसंस्थेमध्ये अर्थपूर्ण योगदान देण्याचे लक्ष्य आम्ही आखले आहे.
T-Hub चे इंटेरिम सीईओ सुजित जागिरदार म्हणाले, “Kotak BizLabs अॅक्सलरेटर प्रोग्राम या निधीउभारणीच्या प्रारंभिक टप्प्यावर असलेल्या स्टार्टअप्सना सामोऱ्या येणाऱ्या आव्हानांना हाताळणाऱ्या परिवर्तनकारी उपक्रमासाठी कोटक महिंद्रा बँकेशी केलेल्या भागीदारीचा T-Hub ला आनंद आहे. कोटकचे दूरदर्शी ध्येय आणि T-Hub च्या परिसंस्थेकडे असलेले अनुभवसिद्ध कौशल्य यांना एकत्र आणण्यामागे स्टार्टअप्सना त्यांच्या विकासाच्या वाटचालीमध्ये मदत करू शकतील अशी संसाधने, मेंटरशिप व उद्योगक्षेत्रातील संपर्क प्राप्त करण्याच्या लक्षणीय संधी निर्माण करणे हे आमचे लक्ष्य आहे. एकत्रितपणे स्टार्टअप्सना एक शाश्वत व्यवसाय उभारण्यासाठी व भारताच्या नवप्रवर्तनाच्या चित्रामध्ये योगदान देण्यास आम्ही उत्सुक आहोत.”
इच्छुक स्टार्टअप्सना https://kotakbizlabs.accubate.app/ext/form/2802/1/apply
येथे Kotak BizLabs अॅक्सलरेटर प्रोग्रामसाठी अर्ज करता येईल.