वेलनेस रिट्रीट्स, क्युरेटेड अनुभव आणि ब्रॅण्डेड निवासस्थानांमुळे उंची उत्पादनांच्या किंमतीत २०२२ पासून ६.७ टक्क्यांची वार्षिक वाढ
मुंबई, नोव्हेंबर २०२५: कोटक प्रायव्हेट बँकिंगने आज कोटक प्रायव्हेट लक्झरी इंडेक्स (केपीएलआय) या उंची उत्पादने व अऩुभवांच्या १२ श्रेणींमधील किंमतींचे चढउतार नोंदविणाऱ्या अशा प्रकारच्या पहिल्यावहिल्या इंडिकेटरचे अनावरण केले. हा निर्देशांक प्रकाशित करण्याच्या कामी सहाय्यक म्हणून कोटक प्रायव्हेट बँकिंगने अर्न्स्ट अँड यंग एलएलपी (ईवाय)ची नियुक्ती केली होती. भारतातील अतिश्रीमंत, उच्च निव्वळ मत्ता असलेल्या (अल्ट्रा-हाय-नेट-वर्थ इंडिव्हिज्युअल्स – यूएचएनआय) आलिशान जगण्याच्या व्याख्येला कशाप्रकारे नवा आकार देत आहे¸ याचे आकडेवारीवर आधारित दर्शन हा निर्देशांक घडवितो.
भारतातील उंची उत्पादनांची बाजारपेठेची २०३० पर्यंत ८५ बिलियन्स डॉलर्सपर्यंत पोहोचण्याकडे वाटचाल सुरू असताना केपीएलआयमधून मालकीकडून अनुभवांपर्यंतचे आणि भौतिक गोष्टींकडून सजगतेने जगण्यापर्यंतचे एक सुस्पष्ट असे परिवर्तन उघड झाले आहे. गुंतवणूकदार, ब्रॅण्ड्स आणि सल्लागारांसाठी हा निर्देशांक केवळ किंमतीचा मागोवा घेत नाही – तर तो एक सांस्कृतिक बॅरोमीटरही आहे.
हा अहवाल प्रकाशित करताना कोटक प्रायव्हेट बँकिंगच्या सीईओ ओइशर्या दास म्हणाल्या, “भारताच्या चोखंदळ अल्ट्रा-एनएनआय वर्गासाठी लक्झरी म्हणजे केवळ उंची गोष्टींची मालकी नव्हे, तर वैयक्तिक आवडीनिवडीनुसार घडविलेल्या गोष्टी, अनन्यता, कारागिरी आणि वारसा हे घटकही उंची जीवनशैलीचा भाग असतात, असे कोटक प्रायव्हेटमध्ये आम्हाला वाटते. आम्हाला मिळालेला आर्थिक विशेषज्ज्ञचा वारसा व मालमत्तेच्या हालचालीविषयीचे सखोल ज्ञान यांचा लाभ घेत, या अहवालाची ही उद्घाटनपर आवृत्ती विविध प्रकारच्या मालमत्ता व जीवनशैलीच्या श्रेणींमधील उंची उत्पादनांसाठीचे सर्वसमावेशक मापदंड पुरविते. लक्झरी इंडेक्सच्या माध्यमातून आम्ही गुंतवणूकदार, ब्रॅण्ड्स आणि सल्लागार यांना या चैतन्यपूर्ण परिसंस्थेला आकार देणारे प्रवाह आणि सांस्कृतिक परिवर्तने समजून घेण्यासाठीचा एक मौल्यवान निर्देशांक देऊ करत आहोत. उंची उत्पादनांमध्ये हेतूपूर्वक गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा अहवाल एक दिशादर्शक ठरणारा आहे, ज्यातून क्लाएन्ट्सना आपल्या संपत्तीत वाढ करण्यास व आपले आयुष्य समृद्ध करण्यास मदत करण्याप्रती कोटकची बांधिलकी प्रतिबिंबित झाली आहे.”
निर्देशांकाची कामगिरी: महत्त्वाच्या नोंदी
• २०२२ पासून ६.७ टक्के वार्षिक वाढ – २०२५ साली केपीएलआय १२२ अंकांनी वर चढला, ज्यातून गेल्या तीन वर्षांतील २२ टक्के वाढ नोंदवली गेली. आलिशान घरे आणि डिझायनर हॅण्डबॅग्जसारख्या श्रेणींनी २०२५ मध्ये इक्विटी सूचकांकांचे मापदंड पार केल्याचे दिसले.
• स्वास्थ्य हे प्रतिष्ठेचे नवे मानक – अमनबाग आणि आनंद यांसारख्या हेल्थ रिट्रीट्सच्या स्वास्थ श्रेणीमध्ये २०२२ पासून १४.३ टक्क्यांपर्यंतची वाढ झाली आहे, दीर्घायुष्य आणि माइंडफुलनेस किंवा जगण्याप्रती सजगता या गोष्टी आता आधुनिक आलिशान जीवनशैलीच्या व्याख्या बनल्या आहेत, हे यातून सूचित होते.
• मालकीपेक्षा अनुभवांचे पारडे जड – अंटार्क्टिक क्रूझिंगपासून ते मिशलिन-स्टार डायनिंगपर्यंत खास अनुभवांच्या सूचकांकाने उसळी घेतली असून २०२२ पासून त्यात ११.६ टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवली गेली आहे, ज्यातून केवळ मालमत्ता नव्हे तर सांगण्यासारख्या कहाण्या गाठीशी बांधण्याची भूक दिसून येते.
• आलिशान रिअल इस्टेट मिळवून देते नवीन ओळख – ब्रॅण्डेड, तंत्रज्ञानाने सुसज्ज निवासी जागांच्या श्रेणीमध्ये २०२२ पासून १०.८ टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवली गेली आहे, ज्यातून रिअल इस्टेट हा संपत्तीचा अव्वल दर्जाचा मानक आहे ही बाब पुन:प्रस्थापित झाली आहे.
• फॅशन अजूनही चलनात, घड्याळे आणि वाइन्समध्ये घट – डिझायनर हॅण्डबॅग्जच्या श्रेणीत २०२२ पासून १०.२ टक्के वाढ झाली तर महागडी घड्याळे आणि फाइन वाइन्समध्ये उतरण दिसली – चैनीच्या वस्तूंबाबतही चढउताराचे चक्र सुरू असते याचाच हा पुरावा म्हटला पाहिजे.
• शिक्षण – उच्चभ्रू वर्गासाठीच्या विद्यापीठांतील शिक्षणावरील खर्चात २०२२ पासून ८.४ टक्क्यांपर्यंतची वार्षिक वाढ झाली, ज्यातून शिक्षण हे उंची जीवनशैली तसेच घरंदाज श्रीमंतीचे प्रतीक ठरल्याचे दिसले.
कार्यपद्धती
केपीएलआय मूल्य धारणा, यूएचएनआयच्या खर्चाच्या पद्धती आणि प्रमाणानुसार १२ श्रेणींमध्ये वार्षिक किमतीमधील बदलांवर देखरेख ठेवते. आधार वर्ष २०२२ तुलनात्मक विश्लेषणासाठी महामारीनंतरचे पहिले बेंचमार्क वर्ष आहे. या श्रेणींमध्ये प्रमुख रिअल इस्टेट, डिझायनर हँडबॅग्ज, लक्झरी घड्याळे, आलिशान अनुभव, आरोग्य व स्वास्थ्य, लक्झरी ऑटोमोबाइल्स, फाइन आर्ट, फाइन ज्वेलरी, डिझायनर शूज, उच्चभ्रू युनिव्हर्सिटीज, फाइन वाइन्स व दुर्मिळ व्हिस्की आणि लक्झरी प्रवासाचा समावेश आहे.
यामधून काय निदर्शनास येते:
• उच्च किमती: वाढती मागणी, टंचाई आणि विशिष्टता व अनुभवांसाठी सांस्कृतिक प्राधान्यक्रम.
• कमी किमती: बाजारपेठेतील सुधारणा किंवा बदलते प्राधान्यक्रम, जसे पारंपारिक संग्रहणीय वस्तूंऐवजी वेलनेस व अनुभवात्मक लक्झरीला प्राधान्य देणे.
हे इंडेक्स सांस्कृतिक व आर्थिक निर्देशांक आहे, ज्यामधून महत्त्वाकांक्षेला अनुसरून गुंतवणूक केली जाण्याचे निदर्शनास येते.
”कोटक प्रायव्हेट लक्झरी इंडेक्समधून दिसून येते की, भारतात लक्झरीला अधिक प्राधान्य दिले जात आहे,” असे ईवायचे पार्टनर भाविन सेजपाल म्हणाले. ”२०२२ पासून २२ टक्क्यांच्या वाढीमधून लक्झरी बाजारपेठ परिपक्व होत असल्याचे दिसून येते, जी वैविध्यपूर्ण, स्थिर असण्यासोबत मालमत्ता निर्मिती व सर्वोत्तम अनुभवांद्वारे संचालित आहे. भारतातील अल्ट्रा-एचएनआय ओळख, वारसा व मूल्याचे जतन म्हणून लक्झरीला नव्या उंचीवर नेत आहेत. रिअल इस्टेट व लक्झरी अनुभवांपासून वेलनेस प्रवासापर्यंत भारत जागतिक लक्झरीच्या भावी अध्यायाला आकार देत आहे.”
भारतातील लक्झरी बाजारपेठेला मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले जात आहे, ज्यामधून सांस्कृतिक उत्क्रांती, आर्थिक स्थिरता आणि महत्त्वाकांक्षी ओळख दिसून येते. केपीएलआय निदर्शनास आणते की, लक्झरी हे एखाद्या व्यक्तीच्या मालमत्तेपुरते मर्यादित राहिले नसून कशाप्रकारे जीवन जगले जाते, यावर अवलंबून आहे.