‘नोबेल प्राइझ डायलॉग’ ३ ते ५ नोव्हेंबर या काळात बेंगळुरू आणि मुंबई येथील विशेष जोड समारंभासाठी भारतात येणार आहे. टाटा ट्रस्टस् सहयोगाने आयोजित करण्यात आलेल्या या डायलॉगद्वारे नोबेल पारितोषिक विजेत्यांचा आघाडीच्या विचारवंतांशी संवाद घडवला जातो. ज्ञान, सर्जनशीलता आणि तरुणांमध्ये केलेली गुंतवणूक यांमुळे अधिक समावेशक, शाश्वत व न्याय्य भविष्यकाळाला कसा आकार दिला जाऊ शकेल, याचा वेध घेण्याच्या उद्देशाने हा संवाद घडवून आणला जातो.
”भारताला प्रथमच भेट देण्याच्या तसेच देशातील विद्यार्थी, संशोधक आणि सामान्य नागरिकांना भेटण्याच्या विचाराने मी खूपच उत्साहित आहे. भारतातील विज्ञानाबद्दलचे प्रेम खरोखर प्रेरणादायी आहे आणि संशोधन व नवोन्मेषाच्या भवितव्याबद्दलच्या कल्पनांचे आदानप्रदान करण्यास मी उत्सुक आहे,” असे या समारंभात सहभागी होणारे एक नोबेल पारितोषिक विजेते डेव्हिड मॅकमिलन सांगतात.
इंडिया डायलॉग्जचा विषय ‘द फ्युचर वी वॉण्ट’ असा आहे. मजबूत लोकशाही व्यवस्था तसेच ज्ञान, सर्जनशीलता व तरुणांमध्ये गुंतवणूक करून देश प्रगती कशी साध्य करू शकतात यावर या विषयाच्या अनुषंगाने विचारमंथन होणार आहे. हे विचारमंथन भविष्यकाळाच्या दृष्टीने पूरक असेल आणि अधिक समावेशक, शाश्वत व न्याय्य असे आनंदाने, विस्मयाने व नवोन्मेषाने भरलेले जग कसे उभे करता येईल याचा वेध घेईल. आगामी दशकांमध्ये आकार घेऊ बघणाऱ्या महाप्रवाहांवर लक्ष केंद्रित करणारी भाषणे व चर्चासत्रे या समारंभात असतील.
या समारंभात नोबेल पारितोषिक विजेते जेम्स रॉबिन्सन (इकॉनॉमिक सायन्सेस, २०२४) आणि डेव्हिड मॅकमिलन (केमिस्ट्री, २०२१) सहभागी होणार आहेत, याशिवाय टोलुल्लाह ओनी, गगनदीप कांग, मोंटेकसिंग अहलुवालिया व कुश परमार यांसारखे विख्यात तज्ज्ञही यात सहभागी होणार आहेत.
”मानवजातीच्या सर्वोच्च लाभासाठी काम करणाऱ्यांचा गेल्या १२५ वर्षांपासून नोबेल पारितोषिक प्रदान करून सन्मान केला जात आहे. आम्ही आमच्यासोबत भारतातील संवादाच्या कथा घेऊन येत आहोत. ज्ञान, सर्जनशीलता आणि सहयोगाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या कथा आहेत. नोबेल पारितोषिकाशी संबंधित प्रभावी कथा देशभरातील जनतेला प्रेरणा देतील आणि आपल्याला हव्या असलेल्या भविष्यकाळाला आकार देतील, अशी आशा आम्हाला वाटते,” असे नोबेल फाउंडेशनच्या एक्झिक्युटिव डायरेक्टर हॅना स्त्यार्न सांगतात.
टाटा ट्रस्टस् सीईओ सिद्धार्थ शर्मा सांगतात: “टाटा ट्रस्टस् गेल्या शतकभराहून अधिक काळापासून समुदायांसोबत काम करण्याच्या आणि दुर्लक्षित व सीमांत समुदायांच्या उन्नतीच्या इच्छेने काम करत आहे. भारतातील सर्वांत जुनी तसेच आशियातील सर्वांत मोठी सेवाभावी संस्था म्हणून आम्हाला लाभलेला वारसा हा समाजाचे ऋण फेडण्याच्या तसेच अधिक चांगल्या भविष्यकाळाला आकार देणाऱ्या कल्पनांच्या पाठीशी उभे राहण्याच्या विचारात रुजलेला आहे. ‘नोबेल प्राइज आउटरीच’सोबत आमचा सहयोग न्याय्य समाज उभा करण्याप्रती तसेच अध्ययन, नवोन्मेष व समावेशन यांमार्फत मानवी प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्याप्रती सामायिक बांधिलकीचा गौरव करणारा आहे.”
नोबेल प्राइज डायलॉग हा समारंभ नोबेल प्राइज आउटरीच आणि टाटा ट्रस्टस् यांनी, नोबेल इंटरनॅशनल पार्टनर्स एबीबी, ईक्यूटी, स्कॅनिया व स्टेग्रा यांच्या मदतीने आयोजित केला आहे.