चित्रकार: मनिष सुतार
स्थळ: जहांगिर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई
कालावधी: २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२४
वेळ: सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत
सफरनामा
मुंबईस्थित सुप्रसिद्ध चित्रकार मनिष सुतार ह्यांच्या जलरंगातील वैविध्यपूर्ण कलात्मकतेने नटलेल्या चित्रांचे एकल प्रदर्शन जहांगीर कलादालन, मुंबई ४००००१ येथे २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२४ ह्या दरम्यान भरणार आहे. ते तेथे सर्वांना रोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत विनामूल्य बघता येईल. ह्या प्रदर्शनातील चित्रे मानवी जीवनातील त्याच्या प्रवासातील अनेक भावपूर्ण कलात्मक पैलू दर्शवितात.
मनिष सुतार ह्यांचे कलाशिक्षण BFA पर्यंत L.S. Raheja School of Arts बांद्रा मुंबई येथे झाले. त्यानंतर त्यांनी अनेक नामांकित कलादालनातून मुंबई, पुणे, हैदराबाद नवी दिल्ली न्यूयॉर्क बायनेल USA , तैपेई-तैवान वगैरे ठिकाणी एकल व सामूहिक कलाप्रदर्शनातून आपली चित्रे रसिकांपुढे ठेवलीत. त्यांच्या प्रदर्शनांना नेहमी रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. पुणे, हैदराबाद वगैरे ठिकाणी आयोजित आर्ट कॅम्प मध्ये त्यांनी भाग घेतला व त्यातून आपली कला सर्वांपुढे सादर केली. त्यांना अनेक मान्यवर संस्थांकडून बक्षिसे व पुरस्कार मिळालेत व मानमरातब ह्यांचा लाभ झाला. भारतात व विदेशात अनेक मान्यवर कलासंग्राहकांकडे त्यांची चित्रे मुंबई, नवी दिल्ली, बंगलोर, केनया, इंग्लंड, जर्मनी, अमेरिका, पॅरिस, इटली वगैरे ठिकाणी संग्रही आहेत.
प्रस्तुत प्रदर्शनात ठेवलेली चित्रे मानवी आयुष्यात येणाऱ्या भावपूर्ण अनुभूती व तशा वैशिट्यपूर्ण कलात्मक संकल्पना ह्यावर आधारित आहेत. मुंबईसारख्या धकाधकीचे वातावरण लाभलेल्या महानगरात माणसाला पदोपदी करावा लागणारा संघर्ष, येणारे सुखद व दुःखद अनुभव, हर्ष, उल्हास, उत्कंठा, प्रतिक्षा, उत्सुकता तसेच उदासीनता, नैराश्य वगैरे भावनिक संकल्पनांचे आणि त्यावरून मानवी जीवनात येणारी गतिमानता वगैरेंचा रम्य आविष्कार त्याने आपल्या तंत्रशुद्ध शैलीत येथे मांडला आहे. ह्यांचे सादरीकरण आपल्या खास वैशिष्ट्यपूर्ण शैलीत येथे चित्रमाध्यमातून मनीष सुतार ह्याने फार कलात्मकतेने केले आहे. आपल्या स्वतःच्या जीवनातील अनुभवांवर तसेच स्वकीय संबंधितांशी निगडित अशा अनुभूतीवर आधारित त्याने आपला मनोहर व चित्ताकर्षक कलाविष्कार ह्या प्रदर्शनात रसिकजनांपुढे चित्रमाध्यमातून सादर केला आहे.