नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत महुआ रे हिचे “अँनाज….. स्प्रिंग फोर्थ” हे चित्र- शिल्प प्रदर्शन

News Service

चित्रकर्ती – महुआ रे
नेहरू सेंटर कलादालन, डॉ. अँनी बेझंट रोड, वरळी, मुंबई
३ ते ९ डिसेंबर २०२४
सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत

अँनाज….. स्प्रिंग फोर्थ

                        सुप्रसिद्ध चित्रकर्ती महुआ रे हिच्या नवनिर्मित कॅनव्हासवरील तैलचित्रांचे व ब्रॉन्झमधील शिल्पांचे एकल कलाप्रदर्शन नेहरू सेंटर कलादालन, डॉ. अँनी बेझंट रोड, वरळी, मुंबई ४०००१८ येथे ३ ते ९ डिसेंबर २०२४ ह्या दरम्यान भरणार आहे. ते तेथे सर्वांना रोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत विनामूल्य बघता येईल. ह्या प्रदर्शनात तिने ठेवलेली चित्रे व शिल्पाकृती तिच्या कल्पकतेचे व सौंदर्यदृष्टीचा वापर करून तयार केलेल्या अद्भुत भावनात्मक कलाकृतींचे वास्तववादी शैलीत सर्वांना दर्शन  घडवितात.

                        महुआ रे हिच्या कलाप्रवासाची सुरुवात तिच्या बालपणातील आईच्या सहवासात केलेल्या अवकाश निरीक्षणातून व अंतरिक्ष दर्शनातून झाली. त्यानंतर तिला विविध कलाकृती बघण्याचा व त्या कलाकारांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. त्यात प्रामुख्याने शहाबुद्दीन, देवीप्रसाद रॉय चौधरी, जोगेन चौधरी, विनोद दुबे, अशोक भौमिक वगैरेंचा समावेश होतो. प्रसिद्ध कलाकार दुर्गाप्रसाद रॉय चौधरी ह्यांच्या हस्ते तिला आपल्या कलाजीवनाच्या सुरुवातीच्या कालखंडात मिळालेल्या  पुरस्कारामुळे व उत्तेजनामुळे योग्य प्रेरणा मिळाली. तिने भारतातील व परदेशातील प्रमुख कलादालनातून एकल व सामूहिक प्रदर्शनातून आपल्या चित्रांचे व शिल्पांचे सादरीकरण केले. मुंबई, नवी दिल्ली, बंगलोर, गोवा, न्यूयॉर्क, कॅनडा, लंडन, पॅरिस, दुबई, अहमदाबाद इत्यादी ठिकाणी तिच्या प्रदर्शनांना रसिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला व त्यामुळे कलाक्षेत्रात आणखी कलाकृती सादर करण्यासाठी योग्य उत्तेजन  मिळाले. तिला अनेक भारतीय व विदेशी कलाप्रवर्तक संस्थांकडून पारितोषके मिळाली असून तिचा गौरव झाला आहे. अनेक मान्यवर कलासंग्राहकांकडे तिची कलारूपे संग्रही आहेत.

                        प्रस्तुत प्रदर्शनात ठेवण्यात येणारी महुआ रे  हिने तयार केलेली तैलरंगातील कॅनव्हासवरील चित्रे व ब्रॉन्झमधील शिल्पाकृती मानवी मनात विविध वातावरणात व प्राकृतिक वैशिष्ट्यामुळे वेगवेगळ्या ऋतूंमध्ये जागृत होणाऱ्या मनोभावना आणि त्यांचे अनेक पैलू दर्शवितात. तसेच ती मानवी मनातील सुप्त विकार व भावना आणि त्यांची कलात्मक  रूपे दर्शवितात. मानवी मनातील विविध प्रकारच्या मानसिक भावनांचे उत्कटपणे प्रकटीकरण आपल्या कलामाध्यमातून साकारताना महुआ रे हिने वास्तववादी शैली, सूक्ष्म निरीक्षणशक्ती, तीव्र आकलनशक्ती आणि सध्याच्या वास्तवाचे भान ह्यांचा समन्वय साधून आपल्या अनेकविध भावोत्कटतेचे सादरीकरण केले आहे. तसेच तिने आनंद, उत्कंठा, उत्सुकता, प्रतिक्षा, द्विधा मनस्थिती, मानसिक अस्थिरता, चंचलता वगैरेचा आपल्या  कलारूपात समावेश केला आहे. विविध ऋतूत  फुलणाऱ्या निसर्गाच्या अनेक रुपांसदृश मानवी संकल्पना व तत्क्षणी मनात उमलणाऱ्या उस्फुर्त भावना व त्यांची उत्कटता तिने आपल्या चित्र माध्यमातून फार परिणामकारक रीतीने येथे सादर केली आहे. तिची प्रत्येक कलाकृती भावपूर्ण, स्वतंत्र व कलात्मक असून ती बोलकी व सौंदर्यपूर्णही आहे. त्यातून तिच्या माध्यमावरील प्रभुत्वाचे व प्रगत वैचारिकतेचे सर्वांना एक रम्य दर्शन होते. स्त्री मनाचा इतरांसह भावनिक सहवास व जवळीक दर्शविताना तिने दर्शविलेली कलात्मकता प्रशंसनीय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button