सिमरोझा आर्ट गॅलरीत कियान(KIAN) फाऊंडेशन द्वारा आयोजित शंपा सरकार दास यांच्या कलाकृतींचे ‘भूमी’ हे कला प्रदर्शन

News Service

पुणे येथील कियान फाऊंडेशन द्वारा आयोजित शंपा सरकार दास या सुप्रसिद्ध चित्रकर्तीच्या कलाकृतींचे प्रदर्शन सिमरोझा आर्ट गॅलरी, ७२, भुलाबाई देसाई मार्ग, ब्रीच कँडी, मुंबई- ४०००२६ येथे दिनांक २५ ते ३१ जानेवारी २०२५ या दरम्यान भरणार आहे. ते तिथे सर्वांना रोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत विनामूल्य बघता येईल.

या प्रदर्शनाचे आयोजन कियान फाऊंडेशन तर्फे आरती नाईक यांनी केले आहे.

सिद्धार्थ नाईक व आरती नाईक यांनी उदयोन्मुख व गुणवान कलाकारांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या चित्रकलेच्या सादरीकरणासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून त्याद्वारे त्या प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांच्यातील सूप्त कलागुणांना वाव देणे ह्या दृष्टीने या फाऊंडेशनची पाच वर्षांपूर्वी स्थापना केली. आजवर त्यांनी अनेक कलाप्रदर्शने, आर्टकॅम्प, कार्यशाळा, कलाप्रात्यक्षिके यांचे ठिकठिकाणी आयोजन केले आहे. होतकरू कलाकारांना त्यांची कला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सादर करण्याची संधी व प्रेरणा आजवर या संस्थेतर्फे दिली आहे. अशा तऱ्हेने ह्या संस्थेने ह्या क्षेत्रात कलेच्या प्रसारासाठी आपले बहुमूल्य योगदान वेळोवेळी दिले आहे. ह्या उपक्रमांचा एक भाग म्हणून यांनी शंपा सरकार दास यांच्या कला कृतीचे प्रदर्शन सिमरोझा कलादालन, मुंबई येथे आयोजित केले आहे.

शंपा सरकार दास हिचे कलाशिक्षण BFA (पेंटिंग) पर्यंत कॉलेज ऑफ आर्ट नवी दिल्ली व MFA (पेंटिंग) पर्यंत जामियामिलिया इस्लामिया येथे झाले. भारतीय तत्त्वज्ञान, संस्कृती, धार्मिक संकल्पना, परंपरा तसेच रितीरिवाज या सर्वांचा प्रतिकात्मक समावेश करून तिने सादर केलेली चित्रे भारतीयत्वाचे द्योतक असणारी सहिष्णुता दर्शवतात. ह्या विविधलक्षी चित्रांमध्ये सौंदर्यपूर्ण संकल्पना व उचित रंगलेपणाबरोबर भावपूर्ण उत्कटता यांचा समावेश आहे. तिने बऱ्याच नामवंत कलादालनातून देशविदेशात आपली चित्रे रसिकांसमोर मांडली असून त्या सादरीकरणास सर्वांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. दक्षिण कोरिया, न्यूयॉर्क, सॅनफ्रँसिस्को, शिकागो, लंडन, व्हिएतनाम, सिंगापूर वगैरे ठिकाणी तिने चित्रांची प्रदर्शने भरून रसिकांची वाहवा मिळवली असून बऱ्याच नामवंत संग्राहकांकडे तिची चित्रेसंग्रही आहेत. अनेक मानसन्मान तिला लाभले आहेत

प्रस्तुत प्रदर्शनात शंपा सरकार दास यांची ठेवलेली विविधलक्षी चित्रे भारतीय संस्कृती, तिची गौरवशाली परंपरा, धार्मिक संकल्पना, रीतीरिवाज, रूढी याबरोबरच मानवी जीवनात असणारे निसर्गाचे महत्त्व, त्याची अनेक ऋतूतील रम्यरूपे, यांचे आकर्षक दर्शन सर्वांना घडवतात. त्याचबरोबर ती चित्रे मानव व जीवन ह्यातील अतूट नाते आणि त्याच्या अनेक भावपूर्ण छटा फार उत्कटपणे दर्शवतात.

अधिक माहितीसाठी संपर्क :
कियान फाऊंडेशन, E-18, वर्षा पार्क, बाणेर रोड, पुणे, महाराष्ट्र, भारत ४११०४५
संपर्क: आरती नाईक – ७३७८७७००५७
ईमेल: aarti@kianfoundation.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button