लेखक-कलाकार जितेंद्र जोशींच्या उपस्थितीत बहुप्रतिक्षीत ‘सुशीला-सुजीत’चा मुहूर्त संपन्न स्वप्नील जोशी, प्रसाद ओक, मंजिरी ओक, संजय मेमाणे, निलेश राठी यांची निर्मिती असलेला आणि अलीकडेच घोषणा झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्कंठा निर्माण करणाऱ्या ‘सुशीला सुजीत’ या मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पार पडला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेवून या चित्रपटाचा मुहूर्तअभिनेता व लेखक जितेंद्र जोशी यांच्या विशेष उपस्थितीत पार पडला. चित्रपटाच्या चित्रीकरणालाही मोठ्या धडाक्यात सुरुवात झाली आहे. स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक हे दोन अभिनेते मित्र पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. या दोघांनी एकत्र काम करावे, अशी प्रतिक्रिया मराठी चित्रपटसृष्टीत आणि सासिकांमध्ये उमटत होती. ती इच्छा ‘सुशीला-सुजीत’च्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. बिग ब्रेन प्रॉडक्शन्स आणि पंचशील एन्टरटेन्मेंट्स यांची निर्मिती असलेल्या ‘सुशीला-सुजीत’ या चित्रपटाच्या मुहूर्ताच्यावेळी प्रसाद, स्वनिल आणि जितेंद्र जोशींसह निर्माते आणि सिनेमॅटोग्राफर संजय मेमाणे, निर्माते निलेश राठी तसेच निर्माती आणि कॉस्च्यूम डिझायनर मंजिरी ओक यांची उपस्थिती होती. प्रसाद ओक, स्वप्नील जोशी, सिनेमॅटोग्राफर संजय मेमाणे हे पहिल्यांदाच एकत्र येवून चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. प्रसाद ओक हे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत तर संजय मेमाणे हे सिनेमॅटोग्राफर असून हे एक यशस्वी कॉम्बिनेशन मानले जाते. पटकथा-संवाद अजय कांबळे यांचे आहेत. चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे. “या चित्रपटाचे नाव जरी ‘सुशीला-सुजीत’ असले तरी हे नाव ऐकण्या किंवा वाचण्यापेक्षा बघण्यात खूप गंमत आहे. त्याचे विज्युअल गमतीशीर आहेत. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच रसिकांमध्ये त्याबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. आमच्याशी बोलताना रसिक आणि आमचे सिनेसृष्टीतील सहकारी विचारणा करत असतात. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच त्याच्या कथेतही गम्मत आहे आणि चित्रपट प्रदर्शित झाल्यावर ती प्रेक्षकांना सुखद धक्का देईल,” असे उद्गार स्वप्नील जोशी यांनी काढले आहेत. प्रसाद ओंक म्हणाले, “दिग्दर्शक आणि कलाकार अशा दुहेरी भूमिकेत मी आहे, त्यामुळे माझी जबाबदारी अधिक आहे. मला स्वप्नीलबरोबर बरीच वर्षे एकत्र काम करायचे होते आणि तो योग आता जुळून आला आहे, याचा मला आनंद आहे. ”संजय मेमाणे म्हणाले, “हा एक आगळा आणि वेगळा व त्याचवेळी दर्जेदार चित्रपट होणार आहे. आम्ही धडाक्यात त्याच्या चित्रिकरणाला सुरुवात केली आहे.” अनेक मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिका यांमधून दमदार भूमिका करणारे स्वप्नील जोशी आज आघाडीचे कलाकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी या आधीही काही चित्रपटांची निर्मिती केली आहे. दुनियादारी, मुंबई-पुणे-मुंबई, मंगलाष्टक वन्स मोअर, फुगे, रणांगण, वाळवी यांसारख्या मराठी तर गुलाम-ए-मुस्तफा, दिल विल प्यार व्यार, लाईफ जिंदगी यांसारख्या हिंदी चित्रपटांत त्यांनी विविध भूमिका केल्या आहेत. प्रसाद ओक यांनी अनेक नाटके, चित्रपट आणि जवळपास मलिकांमध्ये कामे केली आहेत. रमा माधव, बाळकडू, चिरंजीव, फर्झंद, क्षण, ती रात्र, एक डाव धोबीपछाड, हिरकणी, धर्मवीर यांसारखे चित्रपट, पिंपळपान, आभाळमाया, हम तो तेरे आशिक है, क्राईम पॅट्रोल यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे. कच्चा लिंबू, हिरकणी, चंद्रमुखी, वडापाव या चार चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी, बेचकी, रणांगण, आलटून पालटून यांसारखी नाटके यांनी केली आहेत.