भारतामध्ये दर १० प्रौढ व्यक्तींपैकी साधारणत: एका व्यक्तीला थायरॉइडची समस्या असते व दर ११ व्यक्तींपैकी साधारणत: एक व्यक्ती मधुमेह अर्थात डायबेटिसग्रस्त असते. मात्र हे दोन्ही आजार किती वेळा एकमेकांशी जोडलेले असतात याची लोकांना कल्पना नसते. खरेतर टाइप २ डायबेटिस असलेल्या प्रत्येक ४ लोकांपैकी सुमारे एका व्यक्तीला हायपोथायरॉइडिझमची समस्याही असते, ज्यात थायरॉइड ग्रंथी जरुरीपेक्षा कमी सक्रिय असतात. या दोन्ही स्थिती एकाचवेळी उद्भवणे हा काही योगायोग नाही, कारण या दोन्ही स्थिती आपले शरीर ऊर्जेचा वापर कशाप्रकारे करते यावर परिणाम करतात.
थायरॉइड आणि डायबेटिसमधील संबंध समजून घेताना
थायरॉइड ही आपल्या गळ्याच्या पायथ्याशी अॅडम्स अॅपलच्या अगदी खाली स्थित फुलपाखराच्या आकाराची एक ग्रंथी आहे. ही ग्रंथी शरीराच्या चयापचय यंत्रणेचे नियमन करते, जी शरीराकडून ऊर्जेचा वापर व साठा कशाप्रकारे केला जावा यावर परिणाम करते. तुमच्या शरीराने किती वेगाने ऊर्जेचा वापर करावा यावर थायरॉइड संप्रेरके नियंत्रण ठेवतात, तर इन्सुलिन रक्तातील साखरेच्या पातळीच्या व्यवस्थापनास मदत करते. एकत्रितपणे या दोन्ही गोष्टी तुमची चयापचय यंत्रणा सुरळीत चालू ठेवण्यामध्ये मोठी भूमिका बजावतात. त्यामुळे जेव्हा थायरॉइडच्या कामात अडथळा निर्माण होतो, तेव्हा त्याचा साखरेवरील नियंत्रणावरही परिणाम होऊ शकतो व उलटपक्षीही हेच घडते.
अबॉट इंडियाच्या मेडिकल अफेअर्स विभागाच्या प्रमुख डॉ. रोहिता शेट्टी म्हणाल्या, “डायबेटिस असलेल्या व्यक्तींना सर्वसाधारणपणे आपल्या रक्तातील साखरेच्या पातळीची कल्पना असते आणि त्यातील चढ-उतारांना कसे हाताळायचे याची माहिती असते. मात्र थायरॉइडच्या व्याधीमुळे ब्लड शुगरच्या पातळीवर परिणाम होण्याची शक्यता असूनही तिची अनेक लक्षणे दुर्लक्षित राहून जाऊ शकतात.
थायरॉइडशी निगडित आरोग्याची स्थिती व ब्लड शुगरची पातळी या दोन्ही गोष्टी आपल्या कल्पनेहूनही अधिक प्रमाणात एकमेकांशी जोडलेल्या आहेत. म्हणूनच नियमितपणे थायरॉइडची तपासणी करणे महत्त्वाचे आहे. योग्य त्या देखभालीद्वारे थायरॉइड व्याधी परिणामकारकरित्या हाताळता येऊ शकते, ज्यामुळे लोकांना एक स्वस्थ आणि सक्रिय आयुष्य जगण्याची मोकळीक मिळते.”
मुंबईच्या भक्तिवेदान्त हॉस्पिटलमधील एंडोक्रिनोलॉजिस्ट डॉ. अमेय जोशी “आपल्या लोकसंख्येमध्ये निदानावाचून राहून गेलेल्या समस्यांसह जगणाऱ्यांची व परिणामी आवश्यक ते उपचार न घेणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे थायरॉइडच्या स्थितीकडेही बरेचदा दुर्लक्ष होते. डायबेटिस असलेल्या अनेकांना थायरॉइडची समस्या असू शकते, मात्र त्याची लक्षात येण्याजोगी कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत, ज्यांत थकवा, विस्मृती, झोपेच्या समस्या व वजनात अतिरिक्त वाढ होणे इथपासून ते बद्धकोष्ठता, कोरडी त्वचा, थंडी सहन न होणे, स्नायूंमध्ये पेटके येणे व सुजलेल्या पापण्या अशा विविध तऱ्हेच्या लक्षणांचा समावेश होतो. थायरॉइड ग्रंथी जरुरीपेक्षा कमी सक्रिय असेल तर त्याची परिणती उत्साहाची पातळी, वजन, मूड आणि हृदयाच्या ठोक्याच्या गतीमधील चढ-उतारांमध्ये होऊ शकते, कारण ही ग्रंथी या सर्व कार्यांच्या नियमनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असते व शरीरीच्या निरोगी वाढीस मदत करत असते. म्हणूनच थायरॉइडच्या कार्याच्या नियमित तपासण्या, विशेषत: टाइप २ डायबेटिस असलेल्या व्यक्तींसाठी महत्त्वाच्या आहेत.”
डायबेटिस व थायरॉइड व्याधी एकत्र असल्यास त्यातून किडनीच्या समस्यांचा धोका वाढू शकतो, हृदयाचे कार्य ढासळू शकते व रक्ताभिसरणामध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. यातून डायबेटिस रेटिनोपॅथी (रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने दृष्टिपटलातील रक्तवाहिन्यांना इजा पोहोचल्याने ही समस्या निर्माण होते), नसांना इजा पोहोचणे व हृदयविकार या समस्या उद्भवू शकतात .
रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम करणारे थायरॉइडचे प्रकार:
हायपोथायरॉइडिझम (थायरॉइड ग्रंथी जरुरीपेक्षा कमी सक्रिय असणे)
हायपोथायरॉइडिझममुळे शरीराची इन्सुलिनवर प्रक्रिया करण्याची गती मंदावते. याचा अर्थ इन्सुलिन रक्तप्रवाहामध्ये अधिक काळासाठी राहते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अनपेक्षितपणे खाली जाऊ शकते. यामुळे चयापचयाची क्रियाही मंदावते, ज्यामुळे वजन वाढते आणि इन्सुलिनला प्रतिरोध वाढतो. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे अधिकच खडतर बनू शकते. डायबेटिस असलेल्या लोकांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारी थायरॉइडची समस्या म्हणजे सबक्लिनिकल हायपोथायरॉइडिझम, ही एक अशी स्थिती आहे, ज्यात तुमची थायरॉइड ग्रंथी नियमितपणे काम करत नाही, मात्र त्याचे कोणतेही दृश्य परिणाम दिसत नाहीत. टाइप २ डायबेटिसमुळे शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीच्या कार्यामध्ये बदल होत असल्याने हायपोथायरॉइडिझमचा धोकाही वाढू शकतो.
हायपरथायरॉइडिझम (थायरॉइड ग्रंथीची अतिसक्रियता)
हायपरथायरॉइडिझममुळे चयापचयाचा वेग वाढतो. यामुळे शरीर अन्नातून अधिक वेगाने साखर शोषून घेते. मात्र पेशी इन्सुलिनला कमी प्रतिसाद देऊ लागतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. (हायपरग्लायसेमिया). यामुळे डायबेटिस असलेल्या व्यक्तींना ग्लुकोजची पातळी स्थिर राखणे आव्हानात्मक बनते.
हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझम या दोन्ही गोष्टी रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम करतात, व त्यासाठी नियमित देखरेख आणि व्यवस्थापन गरजेचे ठरते.
दुहेरी निदानाचे व्यवस्थापन
थायरॉइड ग्रंथीच्या कार्यातील बिघाडाची समस्या हाताळल्याने डायबेटिस नियंत्रणात मदत होऊ शकते. सकस आहार, नियमित व्यायाम आणि डॉक्टरांनी सांगितलेली औषधे वेळच्यावेळी घेणे, यामुळे थायरॉइड आणि रक्तातील साखरेची पातळी या दोन्ही गोष्टी नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार थायरॉइडचे कार्य व रक्तातील साखर यांची नियमित तपासणी केल्यास त्यातील कोणत्याही बदलांचे लवकर निदान होण्याची हमी मिळू शकते.
सक्रिय राहणे, चांगला आहार व पुरेशी झोप यांच्याद्वारे स्वत:ची काळजी घेणे खरोखरीच उपयुक्त ठरू शकते. तुम्हाला थायरॉइड व्याधी आणि डायबेटिस दोन्ही एकत्र असल्यास तुम्हाला आपल्या आरोग्याकडे अधिकच लक्ष पुरवायला हवे, असे केल्याने तुम्हाला अधिक स्वस्थ वाटेल व आपल्या आवडीच्या गोष्टींचा आनंद घेण्यासाठी अधिक ऊर्जा मिळेल.