महाराष्ट्राचा नंबर वन नॉन फिक्शन शो अर्थात ‘बिग बॉस मराठी’च्या सर्वाधिक गाजलेल्या या सीझनचा दिमाखदार महाअंतिम सोहळा नुकताच (6 ऑक्टोबर) पार पडला. ‘बिग बॉस मराठी’चा ग्रँड फिनाले कसा असणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर अनेक रोमांचक ट्विस्ट, धमाकेदार टास्क आणि सदस्यांच्या एका पेक्षा एक परफॉर्मन्समध्ये प्रेक्षकांच्या ओसंडून वाहणाऱ्या उत्साहात हा महाअंतिम सोहळा पार पडला. भाऊच्या धक्क्यावर काही दिवस रितेश भाऊ न दिसल्याने प्रेक्षकांना त्यांची आठवण येत होती. पण ग्रँड फिनालेला त्यांनी सर्व कसर सोडत आपला कमाल जलवा दाखवला. या महाअंतिम सोहळ्याने आता टीआरपीच्या शर्यतीतदेखील चांगलीच बाजी मारली आहे. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यात हा कार्यक्रम यशस्वी ठरला आहे.
महाराष्ट्राच्या घराघरांत 6 ऑक्टोबरला संध्याकाळी 6 च्या ठोक्याला प्रेक्षक टीव्हीसमोर बसून आपल्या कुटुंबियांसोबत ‘बिग बॉस मराठी’चा ग्रँड फिनाले पाहत होते. या पर्वाचा महाविजेता कोण होणार हे जाणून घेण्याची संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता होती. ‘बिग बॉस’प्रेमी या पर्वाचा विजेता कोण होणार याबद्दल व्हिडीओ कॉल्स आणि व्हॉट्सअप ग्रुपद्वारे चर्चा करत होते. प्रेक्षकांच्या या अफाट प्रेमामुळे ‘बिग बॉस मराठी’चा ग्रँड फिनाले इतिहासातील सर्वात भव्य ठरला आहे.’बिग बॉस मराठी’च्या या सीझनच्या ग्रँड फिनालेला 5.0 टीव्हीआर मिळालं आहे. तर शनिवारच्या विशेष भागाला 4.2 टीव्हीआर मिळालं आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या महाअंतिम सोहळ्यातील लाडक्या भाऊंच्या जादूने महाराष्ट्राला वेड लावलं. ‘बेबी ब्रिंग इट ऑन’ या गाण्यावर रितेश भाऊ जलवा दाखवताना दिसले. त्यांच्या थक्क करणाऱ्या परफॉर्मन्सने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. महाअंतिम सोहळ्यातील रितेश भाऊंचा हा कल्ला जबरदस्त गाजला. सूरज चव्हाण, धनंजय पोवार, अंकिता प्रभू-वालावलकर, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत आणि निक्की तांबोळी या टॉप 6 सदस्यांच्या परफॉर्मन्सने महाअंतिम सोहळ्याला चार चाँद लावले. याच ग्रँड फिनालेला महाराष्ट्राला या पर्वाचा महाविजेता मिळाला.
ग्रँड प्रीमिअरपासून चर्चेत असणाऱ्या ‘बिग बॉस मराठी’चा बोलबाला ग्रँड फिनालेपर्यंत कायम राहिला. संपूर्ण महाराष्ट्राने या सीझनला भरभरून प्रेम दिलं. रसिक प्रेक्षकांच्या या प्रेमामुळेच मातीशी जोडलेला गुलीगत सूरज चव्हाण या पर्वाचा महाविजेता ठरला.