महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले; 20 नोव्हेंबरला मतदान 23 निकाल

News Service

मुंबई : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलं असून, केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर कार्यक्रम आज (दि.15) जाहीर केला आहे. जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. तर, मतमोजणी होऊन निकाल 23 नोव्हेंबरला घोषित केले जाणार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष फुटल्यानंतर ही पहिली विधानसभेची निवडणूक होत आहे. यामुळे राज्याच्या राजकारणासाठी ही निवडणूक महत्त्वाची असणार आहे. निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाल्याने आजपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

मागील वेळी किती टप्प्यात झाल्या होत्या निवडणुका?
या आधी म्हणजे 2019 मध्ये महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये 21 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडले होते. तर, 24 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर करण्यात आले होते. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, सत्तास्थापनेसाठी 145 चे बहुमत आवश्यक आहे. गेल्यावेळी म्हणजे 2019 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला 105, शिवसेना- 56, राकांपा- 54, काँग्रेस – 44 अपक्ष – 13 तर, अन्य- 16 जागा मिळाल्या होत्या. तर, 2019 मध्ये झारखंड विधानसभा निवडणूक पाच टप्प्यात झाली होती. यात पहिला टप्पा 30 नोव्हेंबर, दुसरा 7 डिसेंबर, तिसरा 12 डिसेंबर, चौथा 16 डिसेंबर आणि पाचव्या टप्प्यातील मतदान 20 डिसेंबर रोजी झाले होते. त्यानंतर 23 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात आले होते.

निर्णयांचा अन् योजनांचा पाऊस
विधानसभेच्या तोंडावर महायुती सरकारकडून गेल्या काही दिवसात पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये निर्णयांचा धडाका लावला होता. यात अंगणवाडी सेविकांचे आणि होमगार्ड्सच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर, काल (दि.14) पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. याशिवाय मतदारांना आकर्षित करण्यासाठी लाडकी बहीण योजनाही जाहीर करण्यात आली होती. या योजनेतंर्गत 21 ते 65 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जात आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विधानसभा निवडणुकांमध्ये महायुती सरकारला होतो का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महायुती-महाविकास आघाडीचं बलाबल
महायुती – 162 (भाजप (105), शिवसेना (56), रासप (01), रिपाइं, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम)
महाआघाडी – 105 (राष्ट्रवादी (54), काँग्रेस (44), बहुजन विकास आघाडी (03), शेकाप (01), स्वाभिमानी (01), समाजवादी पक्ष (02)

महाराष्ट्र विधानसभा 2019 निकाल आणि पक्षीय बलाबल
भाजप – 105
शिवसेना – 56
राष्ट्रवादी – 54
काँग्रेस – 44
बहुजन विकास आघाडी – 03
प्रहार जनशक्ती – 02
एमआयएम – 02
समाजवादी पक्ष – 02
मनसे – 01
माकप – 01
जनसुराज्य शक्ती – 01
क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01
शेकाप – 01
रासप – 01
स्वाभिमानी – 01
अपक्ष – 13
एकूण – 288

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button