मुंबई, दि. १७ (प्रतिनिधी) – व्हीलचेअर क्रिकेट, व्हीलचेअर बास्केटबॉल व व्हीलचेअर टेनिस यासारख्या खेळांमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये राज्याचे व देशाचे प्रतिनिधित्व करणा-या खेळाडूंच्या नशिबी उपेक्षा आली आहे. २०१८ पासून मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये नियमित सराव करणा-या खेळाडूंचा सराव विद्यापीठाच्या अधिका-यांनी बंद केला. याबाबत विद्यापीठाच्या अधिका-यांशी व्हिलचेअर स्पोर्टस असोसिएशनने पत्रव्यवहार करुनही त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांच्याशी संपर्क साधून याप्रकरणावर तोडगा काढण्याची विनंती केली आहे.
व्हिलचेअर स्पोर्टस असोसिएशन हि संस्था मुंबई दिव्यांग खेळाडूंसाठी काम करते. खेळाडूंचे सराव सत्र, क्रीडा साहित्य, प्रवास खर्च व सामने आयोजित करण्यासाठी त्यांना या संस्थेकडून पाठिंबा दिला जातो. व्हिलचेअर स्पोर्टस खेळाडू पोलियो, अँप्युटी, पाठीच्या कण्याला दुखापत व सेरेब्रल पाल्सी यांसारख्या वेगवेगळ्या अपंगत्वातील हे खेळाडू आहेत. खेळ हा त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत नसून, काही खेळाडू डिलिव्हरी बॉईज, बाईक मेकॅनिक, ऑटो ड्रायव्हर व चपलांची छोटी दुकाने चालवतात. असे असतानाही त्यांनी खेळणे व नियमित सराव करणे थांबवलेले नाही. तरी देखील मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये नियमित सराव करणा-या खेळाडूंचा सराव विद्यापीठाच्या अधिका-यांनी गेल्यावर्षापासून थांबविला. सराव करण्यास द्यावा म्हणुन व्हिलचेअर स्पोर्टस असोसिएशनने विद्यापीठाच्या अधिका-यांशी पत्रव्यवहार करुनही त्यांना कोणत्याही प्रकारचे सहकार्य करण्यात आले नाही. त्यामुळे त्यांनी खासदार संजय दिना पाटील तसेच युवा सेना कार्यकारणी सदस्य राजोल संजय पाटील यांची भेट घेऊन त्यांना याप्रकरणात मदत करण्याची विनंती केली.