दया पवार स्मृति पुरस्कार दिमाखात संपन्न
प्रतिनिधी / मुंबई
“सांस्कृतिक रणांगणात खेचून राजकीय सत्ता हस्तगत करणारी संस्कृती अलीकडे अस्तित्वात आहे. भारतात ज्यांच्याकडे सांस्कृतिक सत्ता असते, ते राजकीय सत्ता कोणाचीही असली तरी बदल घडू देत नाहीत. त्यामुळे आपण सांस्कृतिक सत्ता हस्तगत करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे,” असे लोकशाहीर संभाजी भगत यांनी दया पवार स्मृति पुरस्कार समारंभाच्या अध्यक्षीय भाषणांत मत व्यक्त केले.
मुंबईच्या दादर माटुंगा कल्चरल सेंटर येथे पद्मश्री दया पवार प्रतिष्ठान आयोजित दया पवार स्मृति पुरस्कार समारंभ पार पडला त्यावेळी बोलताना संभाजी भगत म्हणाले की, बहुजन संस्कृतीतील भाषा, खाद्यसंस्कृती, लोकसंगीत, लोकपरंपरा, आदिम संस्कृती यांचे दस्ताऐवजीकरण करणे महत्वाचे आहे आणि त्यासाठी दया पवार प्रतिष्ठानसारख्या संस्थांनी पुढाकार घ्यावा.
जेष्ठ लेखक व विचारवंत शाहू पाटोळे, पत्रकार सुकन्या शांता आणि लेखिका प्रा.आशालता कांबळे यांना यावर्षीच्या दया पवार स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर ग्रंथाली प्रकाशनाच्या वतीने देण्यात येणारा ‘बलुतं’ पुरस्कार ‘सूर्य गिळणारी मी’ या आत्मकथनाच्या लेखिका अरूणा सबाने यांना अध्यक्ष संभाजी भगत आणि दया पवार प्रतिष्ठानच्या अद्यक्षा हिरा दया पवार यांच्या हस्ते देण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रविंद्र पोखरकर यांनी तर प्रास्ताविक डॉ. प्रज्ञा दया पवार यांनी केले. सविता प्रशांत यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गायिका प्राची माया गजानन यांचे आदिवासी संगीतावरील सप्रयोग व्याख्यान देखील सादर करण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना शाहू पाटोळे म्हणाले की, ‘’आपल्याकडे खरंतर दोन उपवास शास्त्र आहेत.एक शास्त्र उपाशी राहून जगायला शिकवतं तर दुसरं शास्त्र देवदेवतांसाठी केला जाणारा उपवास हे आहे. अन्न हे धर्माशी,जातीशी, वार्णाशी जोडले गेले आहे.आम्ही खातो त्या अन्नाबद्दल अपराध गंडाची भावना शतकानुशतके रुजवली गेली आहे. अन्नात राजकारण आहे तसेच धर्मकारण देखील आहे. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर असते तर गावाकडे चला असं म्हणाले असते कारण समाज सक्षम झाला आहे.”
तुरूंगातील कैद्यांना जाती आधारीत दिले जाणारे काम, भेदभावाची वागणूक यावर लेखन करून सुकन्या शांता यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यावर ३ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत ही प्रथा बंद करण्यासाठी आदेश दिले. त्यांनी केलेल्या या उल्लेखनीय कामगिरी बद्दल यंदाच्या दया पवार स्मृती पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. मनोगत व्यक्त करताना सुकन्या शांता म्हणाल्या की, “तुरूंगाविषयी आजपर्यंत बरंच लेखन झालं आहे.राजकीय कैद्यांनी लिहिलेली तुरुंगाची वर्णनं बरीच प्रसिद्ध झाली आहेत, मात्र यात जात कुठेच आली नाही. दरवर्षी तुरुंगातील जातव्यवस्थेचा उल्लेख फक्त राष्ट्रीय गुन्हे नोंदणीमध्येच येतो, मात्र त्या अनुषंगाने कोणतीच पावले उचलली जात नाहीत.
यावर्षीच्या ग्रंथाली प्रकाशनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ‘बलुतं’ पुरस्काराच्या विजेत्या लेखिका अरूणा सबाने यांनी समाजातील पुरुषी वृत्तीवर भाष्य केले. बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर वाचल्यावर अन्याय सहन करायचा नाही हे मनात पक्कं झालं व संविधान वाचवण्यासाठी आपली सद्सद्विवेक बुध्दी वापरून मतदान केलं पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी नागपूरचे लेखक प्रमोद मुनघाटे यांनी लिहिलेल्या मानपत्राचे वाचन पत्रकार ऋषिकेश मोरे यांनी केले.
दया पवार स्मृती पुरस्काराच्या यावर्षीच्या तिसऱ्या मानकरी आशालता कांबळे यांनी सावित्रीबाई फुलेंच्या कवितेतील ओळी उदधृत करत साहित्यातील पुरुषी वर्चस्ववाद यावर त्यांचे मत मांडले. सावित्रीबाई फुलेंनी १८५४ साली मांडलेली परिस्थिती आजही तशीच आहे. स्त्रियांचे शोषण काही कमी झालेले नाही. ही बाब चिंताजनक आहे.
कार्यक्रमा प्रसंगी पद्मश्री दया पवार यांचे कुटुंबीय व सामाजिक चळवळीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
फोटो ओळ – दया पवार स्मृति पुरस्काराचे मानकरी. (डावीकडून – शाहू पाटोळे, सुकन्या शांता, प्रा. आशालता कांबळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष संभाजी भगत, दया पवार प्रतिष्ठानच्या अध्यक्षा हिरा दया पवार आणि बलुतं पुरस्काराच्या मानकरी अरुणा सबाने)