उत्तर प्रदेशातील ३५ वर्षांची औद्योगिक उत्कृष्टता आणि कौशल्य विकासाला साजरे केले
लखनौ, १५ एप्रिल २०२६: टाटा मोटर्स लिमिटेड या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने आज आपल्या लखनौ प्लांटमधून १० लक्षव्या व्यावसायिक वाहनाची निर्मिती करून ऐतिहासिक टप्पा गाठला. उत्तर प्रदेशातील आपल्या साडेतीन दशकांहून अधिक काळातील उपस्थिती आणि औद्योगिक उत्कृष्टता, आर्थिक विकास, कौशल्य विकास आणि शाश्वत उपजीविका निर्मितीमधील योगदानाचा कंपनीने यानिमित्ताने गौरव केला. भारतातील व्यावसायिक वाहन उद्योग स्वच्छ, स्मार्ट आणि अधिक कार्यक्षम गतिशीलता सोल्यूशन्सकडे वेगाने वळत आहे, ज्यामुळे या टप्प्यामधून भविष्यातील गतिशीलतेला आकार देण्यातील टाटा मोटर्सचे नेतृत्व दिसून येते. या निमित्ताने उत्पादित झालेले १० लक्षवे वाहन एक शून्य-उत्सर्जन इलेक्ट्रिक बस आहे. यामधून उत्तर प्रदेश सरकारचे २०७० पर्यंतचे नेट-झिरो उद्दिष्ट आणि टाटा मोटर्सची २०४५ पर्यंतचे नेट-झिरो लक्ष्य पूर्ण करण्याप्रती असलेली समान कटिबद्धता दिसून येते.

उत्तर प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि टाटा सन्स लिमिटेडचे अध्यक्ष श्री. एन. चंद्रशेखरन यांच्या हस्ते, माननीय उपमुख्यमंत्री श्री ब्रजेश पाठक, टाटा मोटर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गिरीश वाघ, तसेच मान्यवर मंत्री, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ नोकरशहा, सरकारी अधिकारी आणि टाटा मोटर्सचे वरिष्ठ नेते यांच्या उपस्थितीत याला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
या प्रसंगी मत व्यक्त करत उत्तर प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, “टाटा मोटर्सच्या लखनौ कारखान्यातून १० लाख ट्रक आणि बसचे उत्पादन हा संपूर्ण राज्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. यामधून राज्याची क्षमता, अफाट सामर्थ्य आणि येथील प्रतिभावान व्यक्तींचे कौशल्य दिसून येते. उत्तर प्रदेशला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे आमचे ध्येय आहे, ज्यामध्ये उद्योग आणि उद्योजक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. विशाल ग्राहक बाजारपेठ, तरुण व कुशल कार्यबल आणि उत्तम कनेक्टिव्हिटी यामुळे आमचे राज्य व्यवसायांच्या विस्तारासाठी पोषक परिसंस्था प्रदान करते. टाटा मोटर्सचे उत्तर प्रदेशातील यश या परिसंस्थेची ताकद दाखवते आणि जबाबदार औद्योगिक विकासाला चालना देण्याच्या आमच्या कटिबद्धतेला बळकट करते, ज्यामुळे रोजगार निर्मिती, कौशल्य विकास आणि शाश्वत सामाजिक-आर्थिक प्रगती साधली जाईल.”
१९९२ मध्ये स्थापन झालेले टाटा मोटर्सचे लखनौ केंद्र आता त्यांच्या सर्वात महत्त्वाच्या व्यावसायिक वाहन निर्मिती केंद्रांपैकी एक बनले आहे. या ठिकाणी जागतिक मानकांनुसार ट्रक आणि बसचे उत्पादन केले जाते, ज्यामध्ये शून्य-उत्सर्जन इलेक्ट्रिक आणि फ्युएल-सेल इलेक्ट्रिक वाहनांसह विविध पॉवरट्रेन्सचा समावेश आहे. जवळपास ६०० एकरवर पसरलेला हा प्लांट उत्पादनाच्या मोठ्या क्षमतेसह मनुष्यबळ आणि शाश्वततेवर विशेष भर देतो. हा प्रकल्प ८,००० हून अधिक कुटुंबांच्या उपजीविकेला आधार देतो, तसेच प्रमुख प्रशिक्षण उपक्रमांद्वारे उद्योगाशी संबंधित कौशल्ये विकसित करतो. हा प्लांट १०० टक्के नूतनीकरणक्षम ऊर्जेवर चालतो आणि वॉटर-पॉझिटिव्ह (पाण्याची बचत करणारे) केंद्र आहे, ज्यामधून टाटा मोटर्सची सर्वसमावेशक विकास आणि जबाबदार औद्योगिकीकरणाप्रती असलेली कटिबद्धता दिसून येते. याव्यतिरिक्त, हा प्लांट एका मजबूत पुरवठा परिसंस्थेला आधार देतो, ज्यामुळे उत्तर प्रदेश, त्यापलीकडील एमएसएमई आणि पूरक उद्योगांना चालना मिळत आहे.
या प्रसंगी मत व्यक्त करत टाटा सन्स लिमिटेडचे अध्यक्ष श्री. एन. चंद्रशेखरन म्हणाले, “टाटा मोटर्सच्या लखनौ प्लांटमधून १० लक्षव्या व्यावसायिक वाहनाची निर्मिती होणे, यामधून उत्तर प्रदेशसोबत आमच्या दीर्घकालीन भागीदारीची ताकद दिसून येते. तीन दशकांपेक्षा जास्त काळामध्ये उद्योग, सरकार आणि समाज एकत्र येऊन औद्योगिक उत्कृष्टता गाठू शकतात, मोठ्या प्रमाणावर उपजीविका निर्माण करू शकतात आणि क्षमता विकसित करू शकतात, याचे हा सहयोग उत्तम उदाहरण आहे. माननीय मुख्यमंत्री आणि संपूर्ण राज्याने दिलेल्या निरंतर पाठिंब्याबद्दल आणि प्रगतीशील, विकासोन्मुख दृष्टिकोन जोपासल्याबद्दल आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत. उत्तर प्रदेश शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाच्या दिशेने आपला प्रवास वेगवान करत आहे, ज्यासह आम्ही या प्रगतीत योगदान देण्यासाठी आणि भविष्याभिमुख गतीशीलता परिसंस्था तयार करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहोत.”
१० लाख वाहनांच्या उत्पादनाच्या या ऐतिहासिक टप्प्यामधून टाटा मोटर्सची उत्तर प्रदेशप्रती असलेली कायमस्वरूपी कटिबद्धता निदर्शनास येते, जी उत्पादन क्षेत्रातील उत्कृष्टता, लोककेंद्रित विकास आणि जबाबदार औद्योगिकीकरणावर आधारित आहे. कंपनी आपल्या नेट-झिरो प्रवासात पुढे जात आहे, तसाच लखनौ प्लँट भारतासाठी अधिक स्वच्छ, स्मार्ट आणि शाश्वत गतीशीलतेचे भविष्य घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत राहील.
टाटा मोटर्स कमर्शियल वेईकल्स, लखनौ: मनुष्यबळ, शाश्वतता आणि व्यापकतेवर आधारित उत्पादन उत्कृष्टता
आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि मोठ्या प्रमाणावरील ट्रक व बसचे उत्पादन
१९९२ मध्ये स्थापन झालेले टाटा मोटर्सचे लखनौ येथील व्यावसायिक वाहन निर्मिती केंद्र आज कंपनीच्या सर्वात महत्त्वाच्या आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत उत्पादन केंद्रांपैकी एक बनले आहे. जवळपास ६०० एकरच्या विस्तीर्ण परिसरात पसरलेल्या या प्लांटमध्ये मालवाहतूक आणि प्रवासी व्यावसायिक वाहनांची विस्तृत श्रेणी डिझाइन केली जाते. यामध्ये प्रगत शून्य-उत्सर्जन इलेक्ट्रिक बस आणि ट्रक, तसेच फ्युएल सेल इलेक्ट्रिक वेईकल्स (एफसीईव्ही) यांसारख्या आधुनिक पॉवरट्रेन्सचा समावेश आहे.
स्थिरता आणि मोठ्या प्रमाणावरील उत्पादनासाठी डिझाइन केलेल्या या प्लांटची वार्षिक उत्पादन क्षमता एक लाख वाहनांहून अधिक आहे. गुणवत्ता, सुरक्षा आणि कार्यक्षमतेच्या कठोर मानकांमुळे हे केंद्र उत्पादन उत्कृष्टतेचे प्रतीक मानले जाते. लखनौमध्ये तयार झालेली वाहने संपूर्ण भारतातील व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासोबत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात केली जातात, ज्यामुळे जागतिक स्तरावरील ग्राहकांना जागतिक दर्जाची उत्पादने पुरवण्यात या केंद्राची भूमिका अधिक महत्त्वाची ठरते.
मनुष्यबळ, कौशल्य आणि सर्वसमावेशकतेच्या माध्यमातून सामायिक समृद्धीची निर्मिती
टाटा मोटर्सच्या लखनौ प्लांटच्या केंद्रस्थानी कर्मचारी, संधी आणि सर्वसमावेशक विकासाप्रती असलेली सखोल कटिबद्धता आहे. या प्लांटमधून कंपनीचा विश्वास दिसून येतो की कौशल्य विकास, न्याय्य कार्यस्थळे आणि दीर्घकालीन सामुदायिक विकासामध्ये निरंतर गुंतवणूक केल्यास प्रगती अधिक अर्थपूर्ण होते.
हे प्लांट ८,००० हून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देते, ज्यामुळे उत्तर प्रदेशातील प्रादेशिक अर्थव्यवस्था मजबूत होण्यासोबत अनेक कुटुंबांना आणि समुदायांना आधार मिळतो. उत्तर प्रदेशातील टाटा मोटर्सच्या सातत्यपूर्ण उपस्थितीने उपजीविका जोपासण्यात आणि मोठ्या प्रमाणावरील उत्पादनासाठी उत्तर प्रदेशला विश्वासार्ह व भविष्याभिमुख ठिकाण म्हणून प्रस्थापित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
समानता, प्रतिष्ठा आणि समान संधींना महत्त्व देणारे वातावरण निर्माण करण्याच्या निरंतर प्रयत्नांमुळे आज या प्लांटमधील एकूण कर्मचारी वर्गात महिलांचा मोठा वाटा आहे. सर्वसमावेशकतेच्या दिशेने पुढचे पाऊल टाकत या प्लांटने राज्यातील विकलांग व्यक्तींसाठी देखील रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत.
हे प्लांट कौशल्या, लक्ष्य आणि सक्षम यांसारख्या आपल्या महत्त्वाकांक्षी कमवा आणि शिका उपक्रमांद्वारे या प्रदेशातील कौशल्य विकास आणि प्रशिक्षण परिसंस्थेचा आधारस्तंभ बनले आहे. आपल्या नाविन्यपूर्ण ड्युअल सिस्टम ऑफ ट्रेनिंग (डीएसटी) आणि मोठ्या प्रमाणावरील अॅप्रेन्टिसशिप उपक्रमांच्या माध्यमातून टाटा मोटर्स स्थानिक समुदायांसोबत मिळून अर्थपूर्ण रोजगाराचे मार्ग तयार करण्याचे काम करत आहे. या उपक्रमांनी राज्यातील हजारो तरुणांना उद्योगासाठी आवश्यक कौशल्यांनी सज्ज केले आहे, ज्यामुळे त्यांना स्थिरता, कामाचा अभिमान आणि दीर्घकालीन संधी देणाऱ्या सन्मानजनक उपजीविकेच्या दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल करणे शक्य झाले आहे.
मोठ्या प्रमाणावरील उत्पादनासह पर्यावरण संरक्षणास चालना
टाटा मोटर्सचा लखनौ प्लांट आधुनिक आणि जबाबदार उत्पादनाचे एक उत्तम उदाहरण आहे, जेथे व्याप्ती, शाश्वतता आणि प्रगत तंत्रज्ञान यांचा संगम पाहायला मिळतो. पर्यावरण रक्षण केंद्रस्थानी ठेवून डिझाइन केलेला हा प्लांट सीआयआय-प्रमाणित वॉटर पॉझिटिव्ह (पाण्याची बचत करणारा) आहे आणि १०० टक्के नूतनीकरणक्षम विजेवर चालतो, ज्यामुळे या प्लांटचे कार्बनचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाले आहे. महत्त्वाच्या उत्पादन प्रक्रियांमधील ऑटोमेशन आणि रोबोटिक्स, तसेच एआय-सक्षम प्लॅटफॉर्मसह प्रगत डिजिटल आणि इंडस्ट्री ४.० तंत्रज्ञानाचा वापर येथे केला जातो. यामुळे सुरक्षितता, कार्यक्षमता, गुणवत्ता आणि संसाधनांचा सुयोग्य वापर याचे उच्च दर्जाचे मानक सुनिश्चित केले जातात.
एकत्रितपणे, या सर्व क्षमता लखनौ प्लांटला भविष्यातील उत्पादनासाठी आदर्श मॉडेल म्हणून प्रस्थापित करतात, जे आपल्या पर्यावरणीय आणि सामाजिक जबाबदाऱ्यांबाबत जागरूक राहून उत्कृष्ट दर्जाची उत्पादने प्रदान करते.